अर्णब गोस्वामी विरोधात कठोर कारवाईची काँग्रेसची मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हाट्सअॅप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषत: पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. ही कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी म्हणजे 23 फेब्रुवारी, 2019 रोजी याची माहिती अर्णब गोस्वामीला कशी मिळाली? त्याने अजून कोणाला ही माहिती दिली का? या सर्व प्रकाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे गोस्वामीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका काँग्रेसच्यावतीने निवेदन शुक्रवारी (ता.22) देण्यात आले.
याप्रसंगी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, संगमनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाबा ओहोळ, सुभाष सांगळे, सुरेश झावरे, निर्मला गुंजाळ, निखील पापडेजा, कचरु पवार, शालन गुंजाळ, विजय रहाणे, हैदरअली सय्यद, दत्तू कोकणे, शेखर सोसे, तात्या कुटे, शिवाजी गोसावी आदी उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा तांबे म्हणाल्या, गोस्वामी याला देशाच्या सुरक्षेसंदर्भातील अत्यंत गोपनीय माहिती कोणी दिली? त्याने ती माहिती आणखी किती लोकांना दिली? केंद्र सरकारमधील कोण महत्त्वाच्या व्यक्ती अर्णब गोस्वामीला गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवत आहेत का? अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ म्हणाले, रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हाट्सअप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. त्यामुळे या सर्व प्रकाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.