गावठी कट्ट्यांच्या तस्करीत संगमनेरातील दोघे जेरबंद! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; सहा कट्ट्यांसह बारा काडतूसेही हस्तगत..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील गुन्हेगारी घटकांसह वाळु तस्करांकडे गावठी कट्ट्यांची संख्या वाढल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेने कंबर कसली असून जिल्ह्यातील कट्टा तस्करांची शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेत सोमवारी कोल्हारनजीक स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत संगमनेर तालुक्यातील दोघांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून सहा गावठी कट्ट्यांसह बारा जिवंत काडतूसेही हस्तगत करण्यात आली आहेत. अटक केलेल्या दोघातील एकावर संगमनेर व शिर्डी पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये चार गुन्हे दाखल आहेत.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील गुन्हेगारी घटकांवर नियंत्रण मिळवून आरोपींना गजाआड करण्याची कारवाई सुरु असतांनाच सोमवारी (ता.14) गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना खबर्यामार्फत गावठी कट्ट्यांच्या तस्करीची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या नेतृत्त्वाखाली पथक स्थापन करुन त्यांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून कारवाईच्या सूचना दिल्या. त्या प्रमाणे गुन्हे शाखेच्या पथकाने कोल्हारगावच्या शिवारात सापळा लावला.
काही वेळातच पोलिसांना मिळालेल्या वर्णनाचे दोन इसम नगर-मनमाड महामार्गावरुन मनमाडच्या बाजूने हॉटेल जनताच्या दिशेने येत असल्याचे त्यांना दिसले. मिळालेल्या माहितीनुसार सदरचे दोघे तेच असल्याची खात्री पटल्यानंतर पथक सावध झाले. यावेळी दोघेही हॉटेलच्या समोरील बाजूला असलेल्या एका झाडाच्या आडोशाला संशयीतपणे उभे राहिले असता पथकाने एकाचवेळी चोहोबाजूने घेरीत त्यांना जागेवरच जेरबंद केले.
यावेळी त्यांची ओळख विचारुन अंगझडती घेतली असता आरोपी ऋषीकेश बाळासाहेब घारे (वय 21, रा.पारेगाव बु. ता.संगमनेर) याच्या कंबरेला गावठी कट्टा असल्याचे आढळले. तर दुसरा आरोपी समाधान बाळासाहेब सांगळे (वय 27, रा.चिंचोली गुरव, ता.संगमनेर) याच्या पाठीवरील सॅकमध्ये तब्बल पाच गावठी कट्टे व 12 जिवंत काडतूसे आढळली. यासंपूर्ण मुद्देमालाची एकूण किंमत 1 लाख 86 हजार 100 रुपये आहे. दोघांच्या ताब्यातून इतक्या मोठ्या संख्येने कट्टे हाती लागताच पथकाने त्यांच्या हातात बेड्या ठोकून त्यांना लोणी पोलीस ठाण्यात आणले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.हे.कॉ.मनोहर गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन लोणी पोलिसांनी वरील दोन्ही आरोपींविरोधात भारतीय शस्त्र कायद्याचे कलम 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यांची रवानगी कारागृहात केली आहे. यातील समाधान सांगळे हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर दरोडा घालणे, जबरी चोरी करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून अनाधिकाराने घरात घुसणे, मारहाण करुन दुखापत करणे अशा आशयाचे संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात तीन तर संगमनेर शहर व शिर्डी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईने जिल्ह्यात बेकायदा गावठी कट्टे बाळगणार्यांचे धाबे दणाणले आहेत. या धडक कारवाईत गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्यासह पो.हे.कॉ.मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, भाऊसाहेब कुरुंद, संदीप घोडके, विश्वास बेरड, पो.ना.ज्ञानेश्वर शिंदे, विजय ठोंबरे, शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, लक्ष्मण खोकले, पो.कॉ.सागर ससाणे, रविंद्र घुंगासे, आकाश काळे व चालक संभाजी कोतकर यांचा समावेश होता.