संगमनेर पालिकेचा स्वच्छ सर्व्हेक्षणात देशात पाचवा क्रमांक
संगमनेर पालिकेचा स्वच्छ सर्व्हेक्षणात देशात पाचवा क्रमांक
पश्चिम भारतातील सहा राज्यांमधून पाचव्या क्रमांकासाठी निवड
नायक वृत्तसेवा, संगमनेर
केंद्र शासन पुरस्कृत ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत सेव्हन स्टार स्पर्धेत संगमनेर नगरपालिका सहभागी झाली होती. यात पालिकेने स्वच्छतेसाठी ओला कचरा, सुका कचरा, घंडागाडी, खतनिर्मिती, बगीचा निर्मिती, शौचालये व एक रुपयांत 1 लिटर स्वच्छ पाणी अशा विविध उपक्रमांची देशपातळीवर दखल घेतली असून स्वच्छ सर्व्हेक्षणात पश्चिम विभागातील 6 राज्यांमधून संगमनेर नगरपालिकेला पाचवा क्रमांक मिळाला आहे. यामुळे पालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेने सातत्याने लोकाभिमुख काम करुन आपला राज्यात ठसा उमटविला आहे. नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी सतत नागरिक व महिलांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करुन ‘स्वच्छ व हरीत संगमनेर’ बनविण्यासाठी काम केले आहे. शहरात वैभवशाली इमारतींसह 28 नव्या बगीचांची निर्मिती, संगमनेर बाह्यवळण रस्ता, प्रवरा नदीवर चार पूल, रस्ते, भूमिगत गटारी, मोकळ्या जागांमध्ये वृक्षारोपण अशी विविध विकास कामे शहराचे वैभव ठरले आहे. या सर्व कामांची दखल घेवून महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी पालिकेचा विविध पुरस्कारांनी गौरव केला आहे. यापूर्वी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचा दोनवेळेस पुरस्कार देण्यात आलेला आहे. तसेच गतीमान प्रशासन म्हणूनही पुरस्कार मिळाला आहे. वन स्टार मानांकन मिळाले असून ओडीएफचे प्लस प्लस सर्टीफिकेशन प्राप्त झाले आहे.
केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानांतर्गत या स्पर्धेत संगमनेर नगरपालिका सहभागी झाली होती. यावेळी महाराष्ट्रातून 323 नगरपालिकांनी सहभाग नोंदवला होता. संगमनेर नगरपालिकेने राबविलेले घनकचरा व्यवस्थापन, शहरातील स्वच्छता, ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण, कंपोस्ट खतावरील प्रक्रिया, कचरा विल्हेवाटची सर्व प्रक्रिया शासन नियमाप्रमाणे केली जात आहे. याचबरोबर पालिकेचे कर्मचारी 24 तास स्वच्छतेसाठी काम करीत असून कोरोना काळातही सर्वांनी नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी अधिक काम केले आहे. या सर्व्हेक्षणात शहरातील 16 हजार नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या होत्या. या सर्वांची दखल घेत महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा या राज्यांमधील सहभाग घेतलेल्या सर्व पालिकांमधून संगमनेर पालिकेला पाचवा क्रमांक मिळाला आहे. या पुरस्काराबद्दल महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उपनगराध्यक्षा सुमित्रा दिड्डी, आरोग्य सभापती नितीन अभंग, राजेंद्र वाकचौरे, किशोर टोकसे, शमा शेख, सुहासिनी गुंजाळ, सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांच्यावतीने अभिनंदन होत आहे.
संगमनेर पालिकेला प्राप्त झालेल्या पाचव्या क्रमांकाने मनस्वी आनंद होत असून कचरामुक्त शहर होण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन होत असते. शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था व नागरिकांनी याकामी मोठे सहकार्य केले आहे. तसेच पालिकेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका यांनी देखील मोलाची मदत केल्याने हा सन्मान प्राप्त झाला आहे.
– दुर्गा तांबे, (नगराध्यक्षा, संगमनेर)
संगमनेर पालिकेने केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेवून प्राप्त झालेल्या पुरस्काराचा अभिमान आहे. याकामी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांचे नेतृत्वाखाली पालिकेच्या सर्व विभागांतील अधिकारी, कर्मचारी यांनी आपले कर्तव्ये पार पाडून या कामात मोलाची मदत दिली आहे. भविष्यातही पालिका अशाच प्रकारचे कार्य करत राहून देशपातळीवर ठसा उमटवेल.
– डॉ.सचिन बांगर (मुख्याधिकारी, संगमनेर)