टॉवरवरील वीजतारा चोरताना एकाचा फास बसून मृत्यू शिंदोडी शिवारातील घटना; घारगाव पोलिसांत पाच जणांविरुद्ध गुन्हा
नायक वृत्तसेवा, घारगाव
टॉवरच्या वीजवाहक तारा चोरताना पोटास दोरीचा फास लागून एकाचा मृत्यू झाला आहे. शिंदोडी (ता.संगमनेर) शिवारात चोरी करण्याच्या उद्देशाने बळजबरीने उच्च दाब वीजवाहिनीच्या टॉवरवर चढून तार कापताना ती तुटतेवेळी पोटास बांधलेल्या दोरीचा फास लागला. त्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.6) पहाटे एक ते तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
योगेश रावसाहेब दिघे असे मृत्यू झालेल्या वीसवर्षीय तरुणाचे नाव आहे. वडील रावसाहेब सुखदेव विघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पाच जणांविरुध्द घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या संबंधित एक मोटार व टेम्पोही जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, विशाल पंडीत, आदित्य सोनवणे (दोघेही रा.शिंदोडी) योगेश रावसाहेब विघे (रा.पिलानी वस्ती, चिखलठाण, ता.राहुरी), संकेत दातीर (रा.पिंप्रीलौकी) व सरफराज शेख (रा.रामगड, ता.श्रीरामपूर) तसेच एक अल्पवयीन या सर्वांनी योगेश रावसाहेब विघे यास पहाटे एक ते तीनच्या सुमारास शिंदोडी शिवारात आणले.
टॉवरची अतिउंची पाहूनही योगेश विघे यास चोरी करण्याच्या उद्देशाने बळजबरीने विजेच्या टॉवरवर चढवून अॅल्युमिनिअमच्या विजेच्या तारा कापण्यास सांगितले. कापलेल्या तारांपैकी एक अॅल्युमिनिअम धातूची तार तुटताना योगेश याच्या पोटास बांधलेल्या दोरीने फास बसला. त्यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या पाच आरोपींनी मोटारी (एमएच.20, एजी.5258) मधून योगेश विघे यास औषधोपचारार्थ लोणी येथील खासगी रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच तो मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी रावसाहेब सुखदेव विघे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार घारगाव पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलीस करीत आहे.