‘अग्निपथ’ विरोधात आता शेतकरी संघटनाही मैदानात 24 जूनला देशभर तीव्र आंदोलन आंदोलन करण्याचा इशारा

नायक वृत्तसेवा, अकोले
अग्निपथ योजनेंतर्गंत केंद्र सरकारने लष्करात अग्निवीर म्हणून चार वर्षांसाठी युवकांना भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात देशातील अनेक राज्यांत विविध संघटनांची आंदोलनं सुरू आहेत. आता यामध्ये शेतकर्‍यांनीही उतरण्याचा निर्णय घेतला आहे. संयुक्त किसान मोर्चा व अखिल भारतीय किसान सभेने 24 जून रोजी देशभर तीव्र आंदोलन करण्याची हाक दिली आहे, अशी माहिती किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी दिली आहे.

जनतेच्या लष्करीकरणाचा आपला छुपा अजेंडा संघ परिवार या माध्यमातून पुढे नेत असून यामुळे देशाची एकता, सार्वभौमत्व व लोकशाहीलाही मोठे आव्हान दिले गेले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. सैन्य दलात सहभागी होऊ पाहणारे बहुतेक विद्यार्थी, युवक हे शेतकरी कुटुंबातील आहेत. सीमेवर देशाचे रक्षण करणारे बहुतांश सैनिक गणवेशधारी शेतकरीच आहेत. संयुक्त किसान मोर्चाने यामुळेच सीमेवर लढणार्‍या व सैन्यात भरती होऊ पाहणार्‍या सैनिकांच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे डॉ. नवले यांनी सांगितले.

अग्निपथ योजनेंतर्गत सैन्यात घेण्यात आलेल्या या युवक-युवतींना केवळ अडीच महिने ते सहा महिन्यांचे तोकडे प्रशिक्षण दिले जाणार आहे. देशाच्या सुरक्षेशी खेळ करण्याचा अत्यंत निंदनीय असा हा प्रकार आहे. सैन्यदलाच्या गुणवत्तेशी व कार्यक्षमतेशी करण्यात येत असलेला हा खेळ देशाची सुरक्षितता धोक्यात आणणारा आहे. निवृत्ती वेतनाचे पैसे वाचावे यासाठी देशाच्या सुरक्षिततेबाबत अशा प्रकारची जोखीम घेणे कोणत्याही पातळीवर समर्थनीय नाही. चार वर्षांत निवृत्त होऊन नागरी आयुष्यात परतणार्‍या युवक-युवतींना अशा अकाली निवृत्तीनंतर बेरोजगार व्हावे लागणार असल्याने यामुळे जटिल प्रश्न निर्माण होणार आहेत, असा आरोप नवले यांनी केला.

महाराष्ट्रामध्ये 24 जूनला किसान सभेच्या सर्व शाखा या आंदोलनात सहभागी होत आहेत. किसान सभेकडून तहसीलदार कार्यालयांच्या समोर निदर्शने करून या योजनेचा निषेध करणारी निवेदने राज्यभरातील सर्व तहसीलदारांना दिली जाणार आहेत. शेतकरी, युवक, विद्यार्थी व जनतेने तीव्र निषेध करावा व आंदोलनात सक्रीय व्हावे, असे आवाहन डॉ. नवले यांच्यासह डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख आदिंनी केले आहे.

Visits: 19 Today: 1 Total: 117710

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *