संगमनेर शहराभोवतीच्या उकिरड्यांवर बिबट्यांचा ‘वॉच’! वन विभागाकडून सूचना; नागरिकांचे दुर्लक्षच बिबट्यांना खुणावतंय..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही दिवसांपासून प्रवरा आणि म्हाळुंगी नद्यांच्या लगत असलेल्या मानवी वस्त्यांच्या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने हजारो रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर तक्रारींचा ओघ वाढल्याने वन विभागाने परिसरात रात्रीची गस्त सुरु करुन नागरिकांना सतर्क करण्यासह बिबट्यांच्या संचाराची कारणं शोधली जात आहेत. त्यातूनच वस्त्यांच्या भोवताली नागरिकांनी निर्माण केलेल्या कचराकुंड्या आणि उकिरडेच बिबट्यांना खुणावत असल्याचे स्पष्ट झाले असून सहज मिळणार्या भक्ष्यासाठी बिबटे अशा ठिकाणी दबा धरुन बसत असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकार्यांनी ढोलेवाडी ग्रामपंचायतीला लिहिलेल्या पत्रातून समोर आले आहे.
शहरालगतच्या कासारवाडी, ढोलेवाडी, राजापूर, गुंजाळवाडी, सुकेवाडी, मालदाड, कुरण आणि घुलेवाडी ग्रामपंचायत क्षेत्रात दिवसोंदिवस मानवी वस्त्यांमध्ये बेसुमार वाढ होत आहे. त्यातही शहराला अगदीच लागून असलेल्या घुलेवाडी, कासारवाडी, ढोलेवाडी आणि गुंजाळवाडी ग्रामपंचायत हद्दीत तर त्याची गती खूप अधिक आहे. वाढत्या मानवी वस्त्यांमुळे ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली असली तरीही त्या तुलनेत या ग्रामपंचायती नूतन वस्त्यांना मुलभूत सुविधा देण्यात मात्र अजूनही परिपूर्ण झालेल्या नाहीत. त्याचा परिणाम अशा भागात रस्ते, पथदिवे आणि पाण्यासह स्वच्छतेचा प्रश्नही अधिक बिकट असल्याचे दिसून येते.
वस्त्यांची संख्या वाढूनही ग्रामपंचायती मुलभूत सुविधा देत नसल्याने नाईलाजाने असंख्य रहिवाशांना त्याशिवाय राहून आपल्या अडचणींवर स्वतःच मार्ग शोधावे लागत आहेत. त्यातून अलिशान आणि देखण्या वास्तू, रहिवाशी इमारती असून तेथील घरांमधून दैनंदिन कचरा संकलित होत नसल्याने त्या नागरिकांनी आपल्या वसाहतीचा नाला-ओढ्याकडील भाग किंवा काटवनाचा परिसर निवडून परस्पर उकिरडे तयार केल्याची अनेक उदाहरणे शहराभोवतीच्या ग्रामपंचायत क्षेत्रात बघायला मिळत आहेत. रोजच्या कचर्यामध्ये घरातील खरकट्यासह खाद्यपदार्थ, भाज्यांचे टाकावू भागही असल्याने ते खाण्यासाठी साहजिकच भटकी कुत्री, डुकरं यासारखे प्राणी त्याकडे आकर्षित होतात. या भागात एकीकडे बहुतांशी नाल्याचा तर दुसरीकडे म्हाळुंगीचा परिसर आहे. त्यातही आसपासच्या काही भागात शेती केली जात असल्याने ऊसाच्या मळ्यांची संख्याही मोठी आहे.
मागील काही वर्षांमध्ये प्रचंड वाढलेल्या मानवी वस्त्यांमुळे ग्रामीण भागाकडे जाणार्या या भागातील रस्त्यांवरील राबता वाढल्याने महिन्याला नव्याने भर पडणार्या वसाहतींकडे घेवून जाणार्या या रस्त्यांवरील वर्दळही वाढली आहे. दररोज पहाटे शहरातून पायी फिरायला जाणार्यांची संख्याही मोठी आहे. त्यातील बहुतेक नागरिक याच भागात फिरायला येतात. त्यामुळे पहाटेचे काही तास वगळलेत तर दिवसरात्र ग्रामीण असूनही या रस्त्यांवर वर्दळ बघायला मिळते. शहरालगतच्या देवाचामळा, बटवाल मळा, गुंजाळवाडी रोड, ढोलेवाडीचा परिसर, राजापूर रस्ता आणि घोडेकर मळा हा परिसर तर अगदीच शहराला खेटून असल्याने उपनगरांप्रमाणेच ओळखला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून या भागात वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याने दर्शन दिल्याने नागरीकांमध्ये दहशत पसरली आहे.
त्यातच सोशल माध्यमांच्या जगात अफवांना मरणच नसल्याने अनेकांना न दिसलेल्या बिबट्याचेही दृष्टांत पडत असून सोशल माध्यमातून अगदी कुत्र्याच्या शिकारीचे थरार रंगून सांगितले जात आहेत. त्यामुळे दहशतीत भर पडत असून अंधार पडताच नागरिक आपल्या मुलाबाळांसह दारबंद होत आहेत. अनेकांनी वन विभागाकडे तक्रारीही केल्याने विभागाने आपले गस्तीपथक तैनात केले आहे. या पथकाने गेल्या चार-सहा दिवसांत बिबट्याचा वावर असल्याच्या तक्रारी असलेल्या भागात गस्त घालून जनजागृती करण्यासाठी बिबटे का आकर्षित होताय याची कारणंही शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातून भारतीय नागरीकांची स्वच्छतेबाबतची अनास्था पुन्हा एकदा अधोरेखीत झाली.
संगमनेरचे वनक्षेत्र अधिकारी सागर केदार यांनी ढोलेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच व ग्रामसेवकाला पत्र लिहिले आहे. या पत्रात वरीलभागात बिबट्याचा वावर असल्याच्या तक्रारी व त्यावरुन करण्यात आलेली गस्त याबाबत माहिती देण्यात आली आहे. शिवाय या परिसरात अनपेक्षितपणे बिबट्याचा वावर दिसत असल्याने त्यामागील कारणांची मीमांसाही करण्यात आली आहे. त्यानुसार ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दितील मेडिकव्हर हॉस्पिटलच्या पश्चिमेकडील बटवाल मळा वसाहतीजवळचा उल्लेख करण्यात आला आहे. या भागातील नागरीक दैनंदिन कचरा, खाद्यपदार्थ टाकतात. त्यालगतच नाला आणि काटेरी झाडेझुडूप असल्याने तेथे मोकाट कुत्री आणि डुकरांचा मोठा सुळसुळाट दिसून आला. या उकिरड्यावर व झुडपात दिवसरात्र मोकाट जनावरे असल्याने बिबट्याला सहज भक्ष्य प्राप्त होते.
काटेरी झुडूपांमध्ये दडून बसण्यास पुरेशी जागा असल्याने बिबटे त्यात लपून बसतात व सावज टप्प्यात आले की त्यावर झडप घालतात. मानवी वस्त्यांच्या परिसरात बिबट्याचा संचार वाढण्याच्या कारणांमध्ये उकिरडे हेच प्रमुख कारण असल्याने ग्रामपंचायतीने उघड्यावर टाकल्या जाणार्या कचर्याचे व्यवस्थापन करावे, उघड्या खासगी अथवा सरकारी जमीनींवरील काटेरी झाडी व झुडूप काढून टाकून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करण्याची सूचना केली आहे. वन विभाग आपल्या पद्धतीने जागृतीचे काम करीतच आहे, मात्र ते अधिक व्यापक होण्याची गरज असल्याचेही केदार यांनी या पत्रात नमूद केले आहे. त्यावरुन माणूसच बिबट्यांना आपल्याकडे बोलावत असल्याचे स्पष्ट असून स्वयंशिस्तीतूनच त्याला नागरी वस्त्यांपासून दूर ठेवता येईल.
मागील काही दिवसांत अनेकांनी ढोलेवाडी व घोडेकरमळा भागात बिबट्या दिसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने वनविभागाने रात्रीच्या वेळी या भागात गस्त वाढवून लोकांमध्ये जागृतीही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बिबटे वारंवार मानवी वस्त्यांच्या परिसराकडे का आकर्षित होतात याचा अभ्यास केला असता उकिरड्यांच्या कारणांनी गोळा होणारी कुत्री आणि डुकरं हे प्रमुख कारण समोर आले. नागरिकांनी याबाबत काळजी घेतल्यास असे प्रकार कमी होवू शकतात. याबाबत आम्ही ढोलेवाडी ग्रामपंचायतीशी पत्रव्यवहारही केला आहे. आवश्यकता भासल्यास आम्ही पिंजरा लावण्याचीही तयारी केली आहे.
– सागर केदार
(वनक्षेत्र अधिकारी, भाग २, संगमनेर)