संजय राऊतांच्या वक्तव्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनकडून निषेध
संजय राऊतांच्या वक्तव्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनकडून निषेध
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून कारवाईची केली मागणी
मुंबई, वृत्तसंस्था
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनकडून निषेध करण्यात आला असून राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ठाणे शाखेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे डॉक्टरांचं खच्चीकरण झालं असून त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
![]()
संजय राऊत यांनी मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही कंपाऊंडरकडून घेतो, त्याला जास्त कळतं असं विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. संजय राऊत यांनी यावर स्पष्टीकरण देताना कोरोना काळात डॉक्टर देवदूतासारखं काम करत असून माझ्याकडून त्यांचा अपमान झालेला नाही असं म्हटलं आहे. दरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंबंधी पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे.

संपूर्ण जग सध्या कोरोना संकटाचा सामना करत आहे याची तुम्हाला जाणीव आहेच. आरोग्य कर्मचारी फक्त आपला स्वत:चा नाही तर त्यांच्यावर अवलंबून असणारी मुलं, जोडीदार, आई-वडील यांचाही जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशा कठीण परिस्थितीत सरकार आणि राजकारण्यांनी आमच्या बाजूने उभं रहावं अशी अपेक्षा आहे. संजय राऊत यांनी कंपाऊंडरला डॉक्टरपेक्षा जास्त कळतं असं म्हटल्याने आम्ही अस्वस्थ आहोत. आम्ही त्यांच्या या वागण्याचा निषेध करत असून राजीनाम्याची मागणी करतो. अशा नकारात्मक आणि अपमानजनक वक्तव्यामुळे आम्ही डॉक्टर पूर्ण कार्यक्षमता आणि प्रामाणिकपणे काम करु शकत नाही. सर्व डॉक्टरांचे मनोधैर्य खच्चीकरण झालं असून तुम्ही योग्य ती कारवाई कराल अशी अपेक्षा आहे, असे पत्रात म्हंटले आहे.

