राहाता येथील बेकायदेशीर वृक्षतोडीविरुद्ध महिला आक्रमक चौकशी करुन कारवाईची मागणी; अन्यथा उपोषणाचा इशारा
नायक वृत्तसेवा, राहाता
येथील गट क्रमांक 118/5 मधील वृक्षतोड करणार्या व्यक्तीची चौकशी करून त्यावर कारवाई करावी. अन्यथा 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी राहाता चौकात उपोषणास बसण्याचा निर्णय घेणार असल्याचे निवेदन कोपरगाव येथील वनक्षेत्रपाल अधिकारी व राहाता तालुक्याचे तहसीलदार यांना माजी नगरसेविका विमल गायकवाड, मैनाबाई पवार व इतर तीन महिलांच्यावतीने देण्यात आले.
वनक्षेत्रपाल व तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहाता येथील गट क्रमांक 118/5 ही आदिवासी इनामआहे. सदर जमीन ही आमच्या वडिलोपार्जित पूर्वजांची आहे. या जमिनीचे आम्ही वारसदार असून सदर जमिनीत कडूलिंब, बाभळीचे व इतर विविध प्रकारचे अनेक वर्षांची झाडे होती. परंतु तेथील झाडे काही व्यक्तींनी तोडून नेली आहेत. वृक्षतोड करणे कायद्याने गुन्हा आहे.
सदर बेकायदेशीररित्या झालेली वृक्षतोड संदर्भात आपल्या कार्यालयात यापूर्वी अर्ज सादर केला होता. परंतु अर्जाची आपल्या कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. स्थळ निरीक्षण व पंचनामे करून दंडात्मक कारवाई करणे गरजेचे होते. परंतु बेकायदेशीर वृक्षतोड करणार्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. आपण तत्काळ संबंधित बेकायदेशीर वृक्षतोड करणार्या व्यक्ती विरोधात कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा. अन्यथा आम्ही न्याय मिळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी राहाता येथील चौकात उपोषणास बसणार आहोत. प्रशासकीय अधिकारी म्हणून याची सर्वस्व जबाबदारी आपणावर राहील, असे लेखी निवेदन मैनाबाई पवार, मीराबाई मोरे, लता पवार, सरस्वती बर्डे यांनी दिले आहे.
आदिवासी समाज बांधवांच्या शेतामधील अनेक वर्षांपासून असलेले मोठे वृक्ष बेकायदेशीररित्या तोडून त्याची परस्पर विल्हेवाट लावणार्या व्यक्तींवर तत्काळ कारवाई करून संबंधित महिलांना वनक्षेत्रपाल अधिकार्यांनी न्याय मिळवून द्यावा. अन्यथा महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी समाज बांधवांना बरोबर घेऊन उपोषणास बसण्याचा निर्णय घ्यावा लागेल.
– सुखदेव गायकवाड (उत्तर जिल्हाप्रमुख-एकलव्य संघटना)