पालिकेच्या अतिक्रमण विभागाची बस स्थानकासमोर भामटेगिरी! कारवाईचा ‘शो’ करीत फेरीविक्रेत्यांवर दहशत; सणासुदीच्या काळात तुंबड्या भरण्याची योजना?..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर नगरपालिकेचा अतिक्रमण विभाग आणि त्याची काम करण्याची पद्धत हा संगमनेरात नेहमीच चर्चेचा विषय राहीला आहे. शहरातील कोणत्याही ठिकाणी कोणाला टपरी, हातगाडी अथवा पथारी मांडायची असेल तर आधी या विभागाचा ‘म्हसोबा’ पुजावा लागतो, त्याला नैवेद्य दाखवावा लागतो, त्याशिवाय अतिक्रमण थाटण्याचा कौल मिळत नाही. सणासुदीच्या काळात तर शहराचे सर्वच रस्ते असंख्य किरकोळ विक्रेत्यांच्या गर्दीने दाटलेले असतात. हा कालावधी म्हणजे या विभागासाठी महापर्वणीचाच ठरतो, त्यासाठी या विभागाने केलेल्या पूर्वतयारीची झलक आज असंख्य संगमनेरकरांनी पाहीली. त्यातूनच या विभागाच्या रंगीत आणि संगीत चर्चा कानावर येवू लागल्या आहेत. पालिकेच्या प्रशासकांनी या गोष्टी गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

देशभरात दिवाळीचा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतो. गरीब असो की श्रीमंत प्रत्येक भारतीय व्यक्ती या सणाच्या निमित्ताने मोठा खर्च करीत असतो. त्यासाठी नवरात्रीपासूनच देशभरात गृह सजावटीसह विविध वस्तूंची दुकाने, हातगाड्या व फेरीविक्रेत्यांची लगबग बघायला मिळते. असेच दृश्य सध्या संगमनेरातही दिसू लागले आहे. संगमनेरची बाजारपेठ प्राचीन आणि मोठ्या उलाढालीची म्हणून जिल्ह्याला परिचयाची आहे. दिवाळीच्या पंधरवड्यात एकट्या संगमनेरच्या बाजारपेठेची उलाढाल चारशे ते पाचशे कोटींच्या घरात असते. यावरुन आर्थिक उलाढालीत संगमनेरचे महत्त्व अधोरेखीत होते. संगमनेरच्या आर्थिक विकासात ज्याप्रमाणे येथील उद्योग, व्यवसाय व विविध प्रकारच्या चीजवस्तूंची दालने कारणीभूत आहेत, त्याचप्रमाणे रस्त्यावर बसलेल्या फेरीविक्रेत्यांचाही त्यात खारीचा वाटा आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सध्या संगमनेरात रांगोळी, त्यात भरण्याचे रंग व अन्य साहित्य, विविध आकार व प्रकारांचे आकाशदिवे, फुलांच्या माळा, तोरणं, सजावटीच्या विविध वस्तू यांसह लहान मुलांच्या कापडांसह घरगुती वापरासाठी लागणार्‍या विविध वस्तूंचा व्यापार करणार्‍या मात्र हक्काचे दुकान नसल्याने रस्त्याच्या कडेला पथारी मांडून अथवा हातगाडी उभी करुन व्यवसाय करणार्‍यांनी कर्ज काढून अथवा उसनवारी करुन मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करुन दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा सार्वजनिक पातळीवर धुमधडाक्यात साजर्‍या होणार्‍या या उत्सवाची तयारी केली आहे.

त्यामुळे एरव्ही ठरलेला मासिक मलिदा खाऊन सुस्त झालेला पालिकेचा अतिक्रमण विभागही आपल्या कुंभकर्ण झोपेतून जागा होवून सैरभैर होवू लागला आहे. त्यांच्या या कृतीतून मासिक यादीत नसलेल्या, मात्र केवळ दिवाळीच्या निमित्ताने दुकानं थाटून चार-दोन पैसे कमवण्याचा प्रयत्न करणार्‍यांमध्ये मात्र दहशत निर्माण झाली आहे. हे स्पष्ट करणारा प्रकार आज सकाळी बसस्थानकासमोरील नवीन नगर रस्त्यावर घडला असून हा संपूर्ण रस्ता अतिक्रमणांच्या आणि फेरीविक्रेत्यांच्या गराड्यात असतानाही पालिकेच्या अतिक्रमण विभागाने केवळ दोनच टपर्‍या उचकटण्याची कारवाई केली. विशेष म्हणजे एरव्ही अतिक्रमण हटवणारे पथक कोणत्याही भागात पोहोचले की त्या भागातील फेरीविक्रेते गायब होत असतं. आज सकाळी मात्र असा प्रकार घडल्याचे दिसून आले नाही, त्यामुळे आजही ही कारवाईच संशयात सापडली आहे.

या कारवाईतून दोन दिवसांनी साजर्‍या होणार्‍या दसर्‍यासाठी या परिसरात तात्पुरत्या स्वरुपात दुकाने लावणार्‍यांसह फुले विक्रेत्यांवर दहशत निर्माण करण्याचा तर प्रयत्न झाला नाही ना? असेही प्रश्न आता विचारले जात आहेत. शहरात सर्वत्र अतिक्रमणांचा बोलबाला आहे, मर्चंट बँकेसमोरील पालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या भूखंडावर काही फास्ट फूडवाल्यांनी आपला मालकी हक्क प्रस्थापित केलेला आहे, शहरातील अन्य रस्त्यांवरील परिस्थितीही यापेक्षा फारशी वेगळी नाही. असे असतांना ऐन सणासुदीच्या तोंडावर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून ठराविक अतिक्रमणांवरच कारवाईचा आसूड ओढण्याची ही कारवाई हा संपूर्ण विभाग भ्रष्टाचारात चिंब भिजलेला असल्याचेच दाखवणारी ठरली आहे. पालिकेच्या प्रशासकांनी या गोष्टी गांभीर्याने घेवून अतिक्रमण विभागाच्या कामकाज पद्धतीत बदल करण्याची गरजही यातून निर्माण झाली आहे.

Visits: 115 Today: 1 Total: 1587234

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *