ऑनलाइन वाहन खरेदीत बसला मोठा गंडा! न्यायालयाकडून पीडित व्यक्तीला रक्कम परत करण्याचे आदेश

नायक वृत्तसेवा, राहुरी
शहरातील एका व्यक्तीची ऑनलाइन चारचाकी वाहन खरेदीत 48 हजारांची फसवणूक झाली. नगरच्या सायबर क्राईम विभागाने तक्रार दाखल होताच बँक खाते शोधून त्यावर जमा केलेली रक्कम गोठविली. ही रक्कम परत मिळण्यासाठी राहुरी न्यायालयात केलेल्या याचिकेवर न्यायालयाने पीडित व्यक्तीला रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत.

संतोष सखाराम मोरे (रा. राहुरी) असे ऑनलाइन फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मोरे यांनी फेसबुकवर जुनी वॅगनोर गाडी विक्रीची जाहिरात पाहिली. नवीन चारचाकी वाहन खरेदीची ऐपत नसल्याने, ते जाहिरातीला भुलले. जाहिरातीवरील अनोळखी व्यक्तीच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला. 48 हजार रुपयांचा व्यवहार ठरला. अनोळखी व्यक्तीने आर. सी. बुक व इतर कागदपत्रे पाठविली. त्यामुळे खात्री पटल्याने ठरलेली रक्कम अनोळखी व्यक्तीच्या बँक खात्यावर ऑनलाइन पाठविली. परंतु, गाडी मिळाली नाही. नंतर अनोळखी व्यक्तीने मोबाईल नंबर बंद केला.

दरम्यान, फसवणूक झाल्याचे मोरे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी नगरच्या सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी शोध घेतल्यावर ही रक्कम पंजाब नॅशनल बँक (शाखा जुहेरा, जि. भरतपूर, रा. राजस्थान) येथे जमा झाल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी बँकेशी संपर्क साधून ही रक्कम गोठविली. त्यानुसार रक्कम परत मिळण्यासाठी मोरे यांनी राहुरी न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकाकर्ते मोरे यांच्यातर्फे ज्येष्ठ विधीज्ञ व पब्लिक नोटरी प्रकाश संसारे यांनी बाजू मांडली. त्यावर राहुरीच्या मुख्य न्यायाधीश आसावरी वाडकर यांनी शनिवारी (ता.5) निकाल देऊन, ही रक्कम पीडित मोरे यांना परत करण्याचे आदेश दिले आहेत.

Visits: 9 Today: 1 Total: 116450

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *