कोतूळमध्ये विश्वस्त निवडीवरून ग्रामसभेत अभूतपूर्व गोंधळ! तब्बल 44 इच्छुकांची संख्या पुढे आल्याने निवडी रखडल्या
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्याच्या मुळा खोर्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या कोतूळ येथे गुरुवारी (ता.10) विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. श्री क्षेत्र कोतुळेश्वर महादेव देवस्थानसाठी विश्वस्त नेमण्यासाठी ही विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र विश्वस्त निवडीवरून मतभेद निर्माण झाल्याने विश्वस्त निवडीचा निर्णय या विशेष ग्रामसभेत झाला नाही.
कोतूळ परिसराचे जागृत देवस्थान असणारे श्री क्षेत्र कोतुळेश्वर देवस्थानचे नवीन विश्वस्त मंडळाची मुदत संपल्याने नवीन विश्वस्त नेमणुकीसाठी गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच भास्कर लोहकरे होते. या सभेस सुमारे 175 ग्रामस्थ उपस्थित होते. या सभेच्या प्रारंभी ग्रामविकास अधिकारी सुभाष जाधव यांनी या देवस्थानच्या विश्वस्त निवडीविषयाची प्रस्तावना केली. देवस्थानसाठी 5 ते 19 पर्यंतचे नवीन विश्वस्त नेमणूक करण्यासाठी सूचना मांडली. या सभेत तब्बल 44 इच्छुकांची संख्या पुढे आली. यामुळे ही निवड वादग्रस्त ठरली व विश्वस्त नेमणूक करता आली नाही. निवड न झाल्याने सभेचे कामाकाजाचे इतिवृत्त नगर येथील धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. आता धर्मदाय आयुक्त अहमदनगर यांचे मार्गदर्शन घेऊन पुढील प्रकिया पार पडणार आहे. विश्वस्त निवडीवर कोणताही निर्णय जाहीर केला नाही. यामुळे आता धर्मदाय आयुक्तांच्या निर्देशानुसार आता पुढील कार्यवाही होणार आहे.
या सभेत अगस्तिचे माजी संचालक सयाजी देशमुख, बाळासाहेब देशमुख, जिल्हा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम देशमुख, जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख, कारखान्याचे व्यवस्थापक पोखरकर, विधीज्ञ डी. डी. देशमुख, राजेंद्र देशमुख, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख, नेताजी आरोटे, रवींद्र आरोटे, मनोज देशमुख, भाऊसाहेब देशमुख, बाळासाहेब देशमुख, अभिजीत देशमुख आदिंनी आपली मते मांडली.
मुस्लिम समाजाला स्थान द्यावे!
देवस्थान विश्वस्त निवडी करताना या निवडीत गावातील गटतट बाजूला ठेऊन सर्व समाजातील प्रतिनिधी असावेत. यात मुस्लिम समाजाला देखील स्थान द्यावे असे मत राजेंद्र देशमुख यांनी मांडले. पक्ष आणि गट बाजूला ठेवून देवस्थानसाठी वेळ देणार्या व्यक्तींची सर्व समाजातून निवड व्हावी अशी मागणी यावेळी डी. डी. देशमुख यांनी केली.