उद्योग धोरण, व्याप्ती आणि वृध्दीसाठी उद्योजकांनी एकत्र यावे ः मालपाणी उद्योजकांच्या उपस्थितीत ‘द संगमनेर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ची स्थापना


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनची स्थापना नुकतीच मालपाणी हेल्थ क्लब येथे तालुक्यातील उद्योजकांच्या उपस्थितीत करण्यात आली. या कार्यक्रमाास प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून प्रथितयश उद्योजक राजेश मालपाणी उपस्थित होते. संगमनेर तालुक्यामध्ये उद्योजकांच्या अडचणी सोडिवण्यासाठी अशा प्रकारच्या असोसिएशनची गरज होती. उद्योग धोरण, त्याची व्याप्ती वाढविणे आणि व्यवसाय वृद्धीसाठी उद्योजकांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमास उद्योजक अमित पंडित, राजहंस दूधचे कार्यकारी संचालक डॉ. सुजीत खिलारी, संगमनेर औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष भाऊसाहेब एरंडे, ओंकारनाथ भंडारी, सुधाकर सरोदे, विलास वर्पे यांच्याबरोबरच संगमनेर तालुक्यातील अनेक उद्योजक उपस्थित होते. ‘द संगमनेर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’च्या लोगोचे अनावरण यावेळी राजेश मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आले. सह्याद्री ऍग्रोव्हेटचे संचालक नितीन हासे यांनी उपस्थितांना असोसिएशनबद्दलची माहिती, आवश्यकता, होणारे फायदे याबद्दल मार्गदर्शन केले. उद्योग करत असताना फायनान्स, सेल्स, ट्रान्सपोर्ट, शासकीय परवानग्या, टॅक्स, सबसिडी, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता याविषयी योग्य आकलन करून निर्णय घेतले पाहिजे. विजेच्या दराबाबत होणारे निर्णय, उद्योगात वारंवार येणार्‍या अडचणी यासारख्या मुद्यांवर असोसिएशनमध्ये चर्चा होऊन मार्ग निघतील असेही ते म्हणाले.

श्रेयवाद किंवा केवळ संघटना करायची म्हणून नाही तर उद्योजक आणि नव्याने तयार होणार्‍या उद्योजकांचे प्रश्न सुटले पाहिजेत म्हणून हा प्रयत्न असल्याचे हासे यांनी सांगितले. ज्यांचा उत्पादन निर्मिती कारखाना आहे आणि त्यांच्याकडे 8-10 कर्मचारी आहेत अशा उद्योजकांनी या असोसिएशनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
राजेश मालपाणी यांनी उपस्थितांना उद्योजकता, उद्योग समूह, कुटुंब, स्टेकहोल्डर्स, समाज आणि या सर्वांची सांगड कशी घालावी याविषयी मार्गदर्शन केले. मालपाणी उद्योग समूहाचा प्रवास आणि वाटचाल उद्योजकांना समजावून सांगितली. उद्योगामध्ये यश हे लगेच मिळत नाही. तर प्रचंड कष्ट, आत्मविश्वास, आकलन क्षमता, सतत नवीन शिकण्याची तयारी, अंमलबजावणी या गोष्टींमुळे यश मिळते असे सांगितले. अतिशय सुंदर अशा ड्रॅगनफ्लायर गोष्टीमधून आकांक्षा, परिवर्तन, बदल मान्य करणे, प्रेरणा अशा बाबी त्यांनी सांगून संगमनेर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनला शुभेच्छा दिल्या. उद्योजक नितीन हासे, विवेक रोहोकले, कपील चांडक, अभिजीत दिघे, रणजीत वर्पे, सौरभ आसावा, वैभव गुळवे, सुजीत दिघे, दर्शन सरोदे, सम्राट भंडारी आदिंनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.

Visits: 107 Today: 2 Total: 1103206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *