ध्येयवेडी माणसेच इतिहास घडवू शकतात ः डॉ. संजय मालपाणी संगमनेर महाविद्यालय व इतिहास संशोधन मंडळाच्यावतीने हेरीटेज वॉकचे आयोजन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
समाजात ध्येयवेडी माणसेच इतिहास घडवतात मग ते कोणतेही क्षेत्र असो, आपणही असेच कोणतेही एखादे आवडीचे क्षेत्र निवडा आणि अक्षरशः वेडे होऊन त्या क्षेत्रात काम करा, असे वेडे होऊन काम करणे आपल्यातल्या ‘स्व’चा शोध असतो असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना केले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘संगमनेर हेरीटेज वॉक’ या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
संगमनेर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व संगमनेर इतिहास संशोधन मंडळाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या दिवशी ‘संगमनेर हेरीटेज वॉक’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचे संस्थापक आणि कार्याध्यक्ष डॉ. संतोष खेडलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांना विद्यार्थी व प्राध्यापकांनी भेटी देऊन तिथला इतिहास जाणून घेतला. या उपक्रमाचा शुभारंभ शहराच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लड्डा यांच्या उपस्थित करण्यात आला. नगराध्यक्षा तांबे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देताना संगमनेरच्या इतिहासाचा आढावा घेतला. यावेळी नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली.
संगमनेर नगरपालिकेपासून सुरु झालेल्या या हेरीटेज वॉकमध्ये डॉ. संतोष खेडलेकर यांनी कवी अनंत फंदी यांचे जन्मस्थळ, संगमनेरच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक इतिहासात महत्वाचे स्थान असलेले सर डी. एम. पेटीट विद्यालय, संगमनेरची प्राचीन गढी, सप्तशृंगी मंदिर, जुना मोटार अड्डा, अशोक स्तंभ, पंडित नेहरू यांचे सभा स्थान, लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांच्या संगमनेर भेटीची ठिकाणे आणि त्याचा इतिहास, भवानी बाग आदी सुमारे पंचवीस घटना घडामोडींची माहिती दिली. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष डी. बी. राठी, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. प्रताप फलफले, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सचिन कदम, प्रा. डॉ. संदीप कदम, संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचे सचिव देवीदास गोरे, अशोक गवांदे, प्रा. शशांक गंधे यांच्यासह शांताराम डोंगरे, प्रा. डॉ. बाळासाहेब पालवे, प्रा. सागर श्रीमंदिलकर, प्रा. डॉ. श्रीनिवास भोंग, प्रा. डॉ. रोशन भगत, प्रा. डॉ. सागर भिसे, प्रा. डॉ. मोहन मोरे, प्रा. सुरेश भागवत, प्रा. डॉ. अजित कदम, प्रा. प्रवीण त्र्यंबके यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.