अकोलेत घरकुल घोटाळ्याच्या चौकशीसाठी माकपची निदर्शने गटविकास अधिकार्‍यांचे आंदोलनकर्त्यांना चौकशीचे आश्वासन

नायक वृत्तसेवा, अकोले
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बनविण्यात आलेल्या पात्रता याद्यांमध्ये अकोले तालुक्यात मोठा भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाला आहे. यामुळे तालुक्यातील हजारो आदिवासी गरीब शेतकरी, शेतमजूर, घरकुलाच्या लाभापासून यामुळे वंचित राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता.10) माकपच्यावतीने पंचायत समितीसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पंचायत समितीच्या अंधाधुंदी कारभाराविरोधात वेळोवेळी आवाज उठवला होता. 27 सप्टेंबर, 2021 रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली या प्रश्नांच्या संदर्भामध्ये अकोले पंचायत समितीवर मोर्चाही काढण्यात आला होता. मात्र पंचायत समितीचे पदाधिकारी व अधिकारी यांनी माकपने उपस्थित केलेल्या मुद्यांकडे दुर्लक्ष केले. परिणामी आता गावोगावी प्रकाशित करण्यात आलेल्या याद्यांमध्ये यापूर्वी घरकुलाचा लाभ घेतलेल्या व राजकीय आणि आर्थिक दृष्टिकोनातून पुढारलेल्या लाभार्थींचा भरणा झालेला दिसत आहे. बेघर असलेले परंतु सर्वेक्षणाच्या वेळी गैरमार्गाने पैसे देऊ न शकलेले हजारो श्रमिक घरकुलाच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.

आवास प्लस अंतर्गत डेटा एन्ट्री करण्यासाठी डेटा एन्ट्री ऑपरेटर, प्रगणक व पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली होती. डेटा एन्ट्री ऑपरेटरने दररोज 15 कुटुंबांचे सखोल व पारदर्शक सर्वेक्षण पूर्ण करणे अपेक्षित होते. प्रगणकांनी सुद्धा दररोज 15 कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण करावयाचे होते. तसेच पर्यवेक्षक यांनी 10 टक्के कुटुंबे रॅन्डम पद्धतीने तपासायची होती. अशी सखोल चौकशी झाल्यानंतरच पात्र कुटुंबांची माहिती डेटा एन्ट्रीद्वारे निश्चित करावयाची होती. अकोले तालुक्यामध्ये या संपूर्ण प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार झाला असून पैसे घेऊन अपात्र लाभार्थींचा पात्र लाभार्थी म्हणून याद्यांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. गावोगाव या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भामध्ये मोठा असंतोष खदखदतो आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी गुरुवारी अकोले पंचायत समिती येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. गटविकास अधिकारी व संबंधित पंचायत समितीचे अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून चुकीची कारणे देऊन अपात्र केलेल्या लाभार्थींचे अपील अर्जही पंचायत समितीकडे जमा करण्यात आले आहेत. प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची योग्य दखल घ्यावी, गैरव्यवहाराची चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी. अन्यथा मोठा उद्रेक अकोले तालुक्यात होईल अशा प्रकारचा इशारा डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, प्रकाश साबळे, राजाराम गंभीरे, मंगेश गिरहे, शिवराम लहामटे यांनी दिला. यावर गटविकास अधिकार्‍यांनी निवेदन स्वीकारत चौकशीचे आश्वासन दिले.

Visits: 135 Today: 2 Total: 1588908

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *