संगमनेर तालुक्यातील धांदरफळमध्ये बिबट्याचा पुन्हा मानवावर हल्ला! तीन वर्षीय बालिका ठार; पंधरवड्यात एकाच भागातील दुसरी घटना..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
माणूस आणि बिबट्या यांचा एकमेकांशी संघर्ष वाढला असून संगमनेर तालुक्यात एकाच पंधरवड्यात, एकाच परिसरात सलग दुसऱ्यांदा बिबट्याने लहान मुलांवर हल्ला केला आहे. मागच्यावेळी झुंजार मातेने आपल्या काळजाच्या तुकड्याला बिबट्याच्या जबड्यातून वाचविले होते. यावेळी मात्र त्याच परिसरातील तीन वर्षीय बालिकेला मदत मिळण्यापूर्वीच बिबट्याने तिचा बळी घेतला आहे. या घटनेने धांदरफळ खुर्द परिसरात बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली असून या घटनेत निष्पाप बालिकेचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील धांदरफळ खुर्द शिवारातील साकूर मळा परिसरात आज (ता.24) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. येथील वाकचौरे कुटुंबीय आपल्या शेतातील मका कापणीत व्यस्त असताना घराच्या अंगणात शिवांगी संतोष वाकचौरे ही तीन वर्षांची मुलगी एकटी खेळत होती. यावेळी जवळच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याची नजर तिच्यावर खिळली. सावज हेरुन बिबट्याने या चिमुरडीवर हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीच्या आवाजाने शिवानीच्या आई-वडिलांचे लक्ष वेधले गेल्याने त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सैरभैर झालेला बिबट्या बाजूच्या शेतात उडी मारुन पळून गेला.
बिबट्याच्या हल्ल्यात अत्यवस्थ झालेल्या तीन वर्षीय बालिकेला तिच्या आई-वडिलांसह अन्य नातेवाईकांनी तातडीने खाजगी वाहनातून संगमनेरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र या इवल्याशा जीवावर इतक्या मोठ्या जनावराने हल्ला केल्याने तिच्या शरीरावर खोलवर जखमा झाल्या. त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच त्या तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्यानंतर तिच्या आई-वडिलांसह नातेवाईकांनी रुग्णालयात हंबरडा फोडला. हा प्रसंग पाहणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयाला पीळ पडला होता.
या घटनेची माहिती मिळताच संगमनेर उपविभागाचे उपविभागीय वनाधिकारी संदीप पाटील यांनी आपल्या कर्मचार्यांसह धांदरफळ खुर्द परिसरात जाऊन पाहणी केली. यावेळी सरपंच रोहिदास खताळ यांनी बिबट्याचे वाढते हल्ले आणि परिसरातील बिबट्याचा सातत्याचा संचार यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाल्याचे सांगितले. त्यामुळे वनविभागाने तातडीने परिसरात पिंजरा लावावा व नरभक्षक होऊ पाहणाऱ्या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली.
गेल्या पंधरवड्यापूर्वी शेतात घास कापत असलेल्या कविता खताळ या धांदरफळ खुर्द शिवारातील महिलेचा शिव हा चार वर्षीय मुलगा अंगणात खेळत होता. यावेळी शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला करुन त्याला आपल्या जबड्यात पकडून जवळपास दोनशे मीटर फरफटत नेले होते. मात्र त्याची झुंजार माता कविता खताळ यांनी धाडसाने बिबट्या वरच चाल करून आपल्या काळजाच्या तुकड्याला त्याच्या जबड्यातून सोडविले. त्यातून शिव हा चार वर्षीय मुलगा वाचला, आज मात्र बिबट्याच्या हल्ल्यात त्याच परिसरातील शिवांगी नावाच्या तीन वर्षीय बालिकेला आपला जीव गमवावा लागला. या घटनेने धांदरफळ पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. वनविभागाने तातडीने या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करून नागरिकांना भयमुक्त करावे अशी मागणी होत आहे.