नागमठाण पंचक्रोशीतील शेतकर्यांचे गोदावरी पुलावर आंदोलन पुलाचे अर्धवट काम लवकरात लवकर करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
पश्चिम महाराष्ट्र-मराठवाड्याशी जोडणारा नव्याने अस्तित्वात आलेला मध्यवर्ती राज्यमार्ग क्रमांक 216 श्रीरामपूर तालुक्यातून खोकरफाटा, माळवाडगाव, खानापूर, महांकळवाडगांवहून नागमठाण चांदेगाव (ता.वैजापूर) येथे गोदावरी नदीवरील पुलाचे काम अर्धवट राहिल्याने नागमठाण पंचक्रोशीतील शेतकर्यांनी गुरुवारी (ता.10) नदीच्या पाण्यात रखडलेल्या पुलावर जलसमाधी आंदोलनास सुरूवात केली आहे.
या संबंधित सर्व विभागास निवेदन देण्यात येऊन गुरुवारी सकाळी आंदोलन सुरू केल्याने वैजापूर औरंगाबाद प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. वैजापूर शिरगाव येथे पोलीस फौजफाटा तैनात होवून तहसीलदार व कार्यकारी अभियंता देखील तत्काळ दाखल झाले.
दरम्यान, आमदार रमेश बोरनारे यांच्यासह विविध पक्षाच्या पदाधिकार्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन जलसमाधी आंदोलन थांबविण्याची विनंती केली. जिल्हाधिकारी किंवा आयुक्त यांच्या लेखीपत्राशिवाय आम्ही आंदोलन सोडणार नसल्याचे ठाम सांगितल्याने संबंधित अधिकारी सायंकाळच्या आत लेखी पत्र मिळविण्यासाठी धावपळ करताना दिसून आले होते.