विकासाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी केंद्र सरकार कटिबध्द ः आठवले एक हजारांहून अधिक दिव्यांग व्यक्तिंना साधन साहित्याचे मोफत वितरण


नायक वृत्तसेवा, राहाता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखे सक्षम नेतृत्व देशाला पुढे घेवून जाण्याचे काम करीत आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक न्याय देण्याची भूमिका केंद्र सरकार करीत असून, सुगम्य भारत अभियानाच्या माध्यमातून विकासाची प्रक्रिया पुढे घेवून जाण्यासाठी केंद्र सरकार कटिबध्द असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

केंद्रीय आधिकारीता मंत्रालय आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तिंना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून 1 हजारांहून अधिक दिव्यांग व्यक्तिंना मंजूर झालेल्या साधन साहित्याचे मोफत वितरण मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, डॉ. अभिजीत दिवटे, बाळासाहेब गायकवाड, श्रीकांत भालेराव, सुरेंद्र थोरात, प्रकाश लोंढे, पप्पू बनसोडे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री आठवले पुढे म्हणाले, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून सुगम्य भारत अभियान सुरु करण्यात आले असून, यामध्ये आता 21 श्रेणी निर्माण करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून दिव्यांगांना न्याय मिळवून देताना देशातील 1 हजार 314 सरकारी भवन हे सुगम्य बनविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. 35 आंतरराष्ट्रीय विमानतळ, 709 रेल्वेस्टेशन, 614 वेबसाईट, 19 समाचार चॅनल तसेच 8 लाख शाळा या सर्व सुविधांनी परिपूर्ण करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

राज्यातही आमच्या विभागाने समाज घटकांच्या उन्नतीसाठी 2 लाख 44 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून, आत्तापर्यंत राज्यातील 5 हजार 993 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील जिल्हा पुर्नवसन केंद्र तसेच कौशल्य विकास योजनेकरीताही केंद्र सरकारने निधीची उपलब्धता करुन दिली असल्याचे स्पष्ट करुन, आठवले म्हणाले की यू. डी. आय. ए. योजनेच्या माध्यमातून 17 लाख दिव्यांग व्यक्तिंना कार्डचे वितरण करण्यात आले आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा हीच भूमिका केंद्र सरकारची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग व्यक्तिंकरीता सातत्याने सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यांचे सक्षम नेतृत्व देशाला पुढे घेवून जात असून केंद्र सरकारच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक न्यायाचे काम होत आहे. भविष्यात दिव्यांगाच्या आरक्षणाच्या बाबतीतही सरकार संवेदनशिल असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार सदाशिव लोखंडे यांनीही केंद्र सरकारच्या योजनेचे कौतुक करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून वंचितांना न्याय मिळवून देण्याचे काम होत असल्याचे सांगितले.

Visits: 14 Today: 1 Total: 114526

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *