शनिवार व रविवारी होणारे लग्न सोहळे रद्द करण्याचे आदेश! बंद असलेल्या आस्थापनांनी कोविडबाबत तयारी पूर्ण करुन ठेवण्याचीही सूचना..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील वाढत्या कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत राज्यात कठोर निर्बंध घातले आहेत. त्या अनुषंगाने अहमदनगरच्या जिल्हाधिकार्‍यांनी या कालावधीतील निर्बंधाचे स्वरुप कसे व कशावर असतील याबाबत स्वतंत्र आदेश काढले आहेत. त्यानुसार आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसांत लागू असणार्‍या ‘कडक लॉकडाऊन’मध्ये येणारे विवाह मुहूर्त टाळावे लागणार आहेत. त्यासोबतच सध्या बंद असलेली दुकाने व आस्थापने पुन्हा सुरु करण्याच्या दृष्टीने संबंधितांनी कोविडबाबतच्या प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांची पूर्तता करुन ठेवण्याबाबतही या आदेशातून सूचित करण्यात आले आहे.

गेल्या 5 एप्रिल रोजी अहमदनगरच्या जिल्हाधिकार्‍यांनी जारी केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने संगमनेरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनी पत्रकारांना अधिक माहिती देताना 30 एप्रिलपर्यंतच्या ‘कठोर निर्बंधा’चे विश्लेषण केले आहे. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत सामान्य नागरिकांच्या हालचालींवर कोणतीही बंधने नसली तरीही जमावबंदी आदेश लागू राहील.

या कालावधीत शासनाने जाहीर केलेल्या अत्यावश्यक सेवांसह परवानगी देण्यात आलेल्या अन्य सेवा व आस्थापना सुरू राहतील, मात्र त्या सर्वांना कोविडबाबतच्या नियमांचे कठोर पालन करावे लागेल. या कालावधीत लग्नसोहळ्यांना पन्नास जणांच्या उपस्थितीत व जारी केलेल्या निर्देशानुसार पूर्तता केल्यास परवानगी असेल, मात्र त्याबाबत पोलिसांकडून पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. तसेच या कालावधीत दररोज रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीत जिल्ह्यात संचारबंदी लागू असेल व सामान्य नागरिकांच्या हालचालींवरही मर्यादा असतील.

यासोबतच शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 या कालावधीत राज्यासह जिल्ह्यात लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत वैद्यकीय सेवांशी निगडित व्यक्तिंच्या व औद्योगिक क्षेत्रात काम करणार्‍या कामगारांच्या कामावर येण्या-जाण्याच्या हालचाली वगळता उर्वरीत सर्व गोष्टी पूर्णतः बंद असतील. या कालावधीत ज्यांनी आपल्या लग्नाचे मुहूर्त काढले असतील त्यांना मात्र आपला विवाह सोहळा पुढे ढकलावा लागणार आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशान्वये शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 या कालावधीत येणारा मुहूर्त साधण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे शनिवार अथवा रविवारी ज्यांची घटीका समीप आली होती, ती आता काही अंशी लांबणार आहे.

सद्यस्थितीत केवळ अत्यावश्यक व कृषी विषयक सेवा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. उर्वरीत सर्व व्यवसाय बंद आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंधांना विरोध होत असल्याचेही समोर आले आहे. संगमनेरातही व्यापार्‍यांची शिखर संस्था असलेल्या व्यापारी असोसिएशनने प्रांताधिकार्‍यांना भेटून याबाबत चर्चा केली आहे. जिल्हाधिकार्‍यांनी मात्र आपल्या आदेशात बंद असलेल्या व्यावसायिकांनी या दरम्यानच्या कालावधीत दुकानातील सेवकांचे लसीकरण अथवा आरटीपीसीआर करुन घ्यावे, दुकानात पारदर्शी सुरक्षा कवच, काच अथवा पारदर्शी कागद लावणे, दुकानाचे निर्जंतुंकीकरण करणे, सामाजिक अंतराचे चौकोन आखणे यासारख्या कामांची पूर्तता करुन ठेवण्यास सूचविले आहे, ज्यायोगे परिस्थितीनुसार बंद असलेली दुकाने सुरू करण्यास मुभा दिली जावू शकते.

राज्यात पुन्हा लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला ठिकठिकाणी मोठा विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र राज्यातील कोविडचा वाढता प्रादुर्भाव आणि रोजच्या रुग्णसंख्येमुळे विरोध झाला तरीही निर्बंध पाळावेच लागणार आहेत. राज्यातील रुग्णांची संख्या एकसारखी वाढत असल्याने आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढला आहे. त्यातच सर्व व्यवहार सुरळीत राहील्यास रोजच्या रुग्ण सरासरीत मोठी वाढ होवून राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास राज्यासमोर गंभीर संकट उभे राहू शकते, त्यामुळे सध्या लागू असलेले निर्बंध प्रत्येकाने कटाक्षाने पाळून ‘ब्रेक द चेन’ यशस्वी करण्यासाठी शासन व प्रशासनाला साथ देण्याची गरज आहे.

शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असणार्‍या कडक लॉकडाऊनमध्ये वैद्यकीय व औद्योगिक कर्मचार्‍यांसह हॉटेल्स अथवा रेस्टॉरंटमधून घरपोहोच सेवा देण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र अशी सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांचे एकतर लसीकरण झालेले असावे अथवा त्याची आरटीपीसीआर चाचणी झालेली असावी व तो निगेटिव्ह असल्याबाबतचे प्रमाणपत्रही (अहवाल प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांसाठी) सोबत असणे आवश्यक आहे. असे नसल्यास संबंधित व्यक्तिकडून एक हजार रुपये व त्याच्या मालकाकडून 10 हजार रुपये दंड वसूल करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत, यासोबतच असा प्रकार दुसर्‍यांदा घडल्यास आपत्ती कालावधीत त्या आस्थापनेचा परवाना रद्द करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

Visits: 15 Today: 1 Total: 117197

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *