वाईन विरोधात पुरोगामी चळवळींचे तालुके सरसावले! संगमनेर पाठोपाठ आता अकोल्यातूनही सरकारच्या निर्णयाला होतोय विरोध
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देणार्या राज्य सरकारच्या निर्णयाला संगमनेर-अकोले तालुक्यातून मोठा विरोध होवू लागला आहे. याबाबत संगमनेरच्या किराणा व्यापारी संघटनेने संगमनेरात वाईन विकणार नसल्याचे निवेदन दिल्यानंतर आता अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते व वारकरी सांप्रदाय पुढे सरसावला असून कोणत्याही परिस्थितीत अकोल्यातील किराणा सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री सुरु होऊ देणार नसल्याचे बजावण्यात आले आहे. यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासोबत आंदोलनात सहभागी होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. संगमनेर व अकोले पुरोगामी विचारांचे आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून विचारांची चळवळ उभी करणारे तालुके समजले जातात. या दोन्ही तालुक्यांनी वाईन विक्री विरोधात एकाचवेळी शड्डू ठोकल्याने जिल्ह्याच्या नेतृत्त्वाखाली राज्यात वाईन विक्री विरोधात मोठी चळवळ उभी राहण्याची शक्यताही यातून निर्माण झाली आहे.
शेतकरी हिताचा निर्णय म्हणत राज्य सरकारने वाईन विक्रीला राजमान्यता दिली आणि आता एक हजार चौरस फुटापेक्षा मोठ्या असलेल्या किराणा दुकानांमध्ये (सुपर शॉपी) त्याच्या विक्रीला परवानगी देवून एकप्रकारे वाईनला समाजमान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाला राज्यातील विरोधी पक्षच नव्हे तर विविध सामाजिक संघटना व वारकरी सांप्रदायाकडूनही मोठा विरोध होवू लागला आहे. संगमनेरातील किराणा व्यापार्यांच्या संघटनेने सरकारच्या निर्णयाला विरोध करीत संगमनेरातील व्यापारी वाईनची विक्री करणार नसल्याचा निर्णय जाहीर केला आहे. याबाबत संघटनेने संगमनेरच्या प्रांताधिकार्यांना निवेदन देत सरकारने घेतलेला निर्णय त्वरीत मागे घेण्याचीही मागणी केली आहे.
त्या पाठोपाठ आता अकोले तालुकाही पुढे सरसावला असून दारुबंदी कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी आणि वारकरी सांप्रदायाचे दीपक महाराज देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली जनजागृती अभियान सुरु करण्यात आले आहे. अकोल्यातील सर्व सुपर मार्केटमध्ये जावून त्यांना वाईन विक्री तरुणाईला बर्बाद करणारी असल्याचे सांगून त्याला विरोध करण्याची विनंती केली जात असून या आंदोलनाला अकोल्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या उपरांतही सरकार आपल्या भूमिकेवर कायम राहील्यास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
संगमनेर किराणा असोसिएशनने दिलेल्या निवेदनात सरकारचा वाईन विक्रीचा निर्णय अत्यंत दुर्दैवी, समाजघातक व राष्ट्रघातक असल्याचे म्हंटले आहे. भावी पिढीला व्यसनात ढकलणार्या व संस्कृतीचा नाश करणार्या या निर्णयाला विरोध करतांना संघटनेने सदरचा निर्णय त्वरीत मागे घेण्याची मागणीही केली आहे. संगमनेरातील कोणताही किराणा व्यापारी आपल्या दुकानात वाईनची विक्री करणार नसल्याचेही या निवेदनातून बजावण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष श्रीगोपाळ पडताणी यांच्यासह जगदीश बद्दर, नितीन गुंजाळ, मुकेश कोठारी, शरद गांडोळे, रुपेश राहातेकर या प्रमुख व्यापार्यांसह संघटनेच्या सदस्यांच्या सह्या या निवेदनावर आहेत.
तर अकोल्यातील दारुबंदी आंदोलन व वारकरी संप्रदायाने संयुक्तपणे शहरातील किराणा सुपर मार्केट चालकांच्या भेटी घेवून त्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवदेनातून वाईन विक्री तरुण पिढीला व्यसनाधीन बनविणारी ठरणार असल्याने अकोल्यातील किराणा दुकानदारांनी त्याची विक्री करु नये असे आवाहनही या माध्यमातून केले जात आहे. या आंदोलनात वारकरी संप्रदायाचे दीपक महाराज देशमुख, ज्येष्ठ कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, संतोष मुर्तडक, प्रा.शांताराम गजे, राजेंद्र महाराज नवले, भाऊसाहेब वाकचौरे, श्रीरंग भाटे, सुभान शेख, सुनील शेळके आदिंनी सहभाग घेतला असून जनजागृतीची मोहीम राबविली जात आहे. पुरोगामी विचारांचा पगडा असलेल्या संगमनेर व अकोले तालुक्यात स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालावधीत अनेक चळवळी उभ्या राहील्या आणि त्याची धग देशभर पसरली. आता राज्य सरकारच्या वाईन विक्री विरोधातही दोन्ही तालुक्यांमधून जनक्षोभ उभा केला जात असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनीही या निर्णयाला दुर्दैवी म्हणत प्राणांतिक उपोषणाचा इशारा दिल्याने जिल्ह्यात सरकारच्या वाईन विक्री निर्णयाविरोधात जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे. या आंदोलनात संगमनेर व अकोले तालुक्याची भूमिका निर्णायक असेल असेही चित्र निर्माण होत आहे.