संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांची धडाकेबाज कारवाई! सोनसाखळी चोरांची टोळी उघड; संगमनेरातील अनेक गुन्ह्यांचे तपास लागणार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
नववर्षाच्या सुरुवातीपासूनच संगमनेर तालुका हद्दित धुडगूस घालून महिलांच्या गळ्यातील अलंकार ओरबाडणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात संगमनेर पोलिसांना यश आले आहे. पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने गेल्या महिनाभर अथक परिश्रमातून श्रीरामपूर तालुक्यातील सोनसाखळी चोरांची टोळी उघड केली असून त्यातील दोघांना गजाआड करण्यात आले आहे. या टोळीने संगमनेर शहरात पाच ठिकाणी धुमस्टाईल दागिने लांबविल्याचे तपासात समोर आले असून त्यांच्याकडून आणखीही काही गुन्हे उघड होण्याची दाट शक्यता आहे. पकडण्यात आलेल्या दोघांच्या चौकशीतून अन्य आरोपींचीही ओळख समोर आली असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. या टोळीच्या दोघा सदस्यांनी पाच गुन्ह्यांची कबुली दिली असली तरीही त्यांच्याकडून अद्याप मुद्देमाल हस्तगत झालेला नाही.


गेल्या काही वर्षांपासून संगमनेर शहर व तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दित सामसुम असलेल्या रस्त्यांवरुन जाणार्‍या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या ओरबाडून नेण्याच्या घटनांमध्ये सतत वाढ झाल्याचे दिसून येते. अशा प्रकारच्या चोर्‍यांमध्ये सहभागी असलेले चोरटे अतिशय निष्णात आणि गर्दीच्या रस्त्यांवरही भरधाव दुचाकी चालविण्यात माहीर असतात. त्यातच अनेकदा या चोरट्यांचे चेहरे आणि मोटार सायकलचे क्रमांकही सीसीटीव्ही फूटेजमध्ये रेकॉर्ड होतात. मात्र यातील बहुतेक प्रकरणात चोरट्यांचे चेहरे स्कार्पने झाकलेले असतात, तर त्यांच्याकडील मोटार सायकली हमखास चोरीच्या आणि बनावट क्रमांकाच्या असतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे पोलिसांसाठी अतिशय जिकरीचे असते.


संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने मात्र याला अपवाद ठरले आहेत. गेल्या काही महिन्यांत संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दित संगमनेर महाविद्यालयाचा परिसर, गोल्डनसिटी (गुंजाळवाडी), ऑरेंज कॉर्नर, स.म.भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल व जाणता राजा मैैदानाच्या परिसरातून अशाच प्रकारच्या घटना समोर आल्या होत्या. यातील काही ठिकाणच्या घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैदही झाल्या होत्या. त्यातील उपलब्ध फूटेजचे अतिशय बारकाईने विश्‍लेषण करीत उपअधीक्षक मदने यांनी संगमनेर शहरात घडलेल्या चोरीच्या घटना व लोणी आणि सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दित घडलेले अशाच प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी एकच असल्याचे तपासातून समोर आणले. त्याची पक्की खात्री पटताच गेल्या महिन्याभरापासून त्यांचे पथक या चोरट्यांच्या मागावर होते, मात्र प्रत्येकवेळी चोरटे त्यांना हुलकावणी देण्यात यशस्वी ठरत होते.


यातील संगमनेर महाविद्यालयाजवळ घडलेल्या घटनेत चोरट्यांची दुचाकी घसरल्याने त्यांनी ती तेथेच सोडून पलायन केले होते. सदरची दुचाकी चोरीची असल्याचे व त्यावरील क्रमांक उल्हासनगर येथे नोंदणी झालेला अन्य वाहनाचा असल्याचेही त्याचवेळी समोर आले होते. मात्र यासर्व घटनांमध्ये श्रीरामपूरमधील वडाळा महादेव येथील टोळीचाच सहभाग असल्याचा निष्कर्ष उपअधीक्षक मदने यांनी काढला व त्यांच्या तपासाची दिशाही तिच होती. गेल्या 5 फेब्रुवारीरोजी अहमदनगरच्या गुन्हे शाखेने वडाळा महादेव येथील सराईत चोरटा संदीप दादाहरी काळे याच्यासह विशाल बालाजी भोसले (रा.अशोकनगर, श्रीरामपूर) या दोघांना साडेसात लाखांच्या मुद्देमालासह पकडले होते.


त्यांच्या चौकशीतून वडाळा महादेव येथीलच योगेश सिताराम पाडेकर व नाशिकच्या पळसे कारखाना परिसरातील लहु बबन काळे यांचीही नावे समोर आली होती. मात्र गुन्हे शाखेची पथके त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांनी धुम ठोकल्याने ते पोलिसांच्या हाती लागले नव्हते. दरम्यान त्यापूर्वीच संगमनेर शहर हद्दित घडलेल्या गुन्ह्यात योगेश पाडेकरची ओळख पटविण्यात संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांना यश आल्याने त्यांचे पथक पाडेकरच्या मागावर होते. गुन्हे शाखेच्या चौकशीत त्यांच्या हाती लागलेल्या संदीप काळे या सराईत गुन्हेगाराने संगमनेर शहर व तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दितील प्रत्येकी एका गुन्ह्याची कबुलीही दिली होती. मात्र पाडेकर आणि लहु काळे यांना पकडण्यात गुन्हे शाखा अपयशी ठरली.


गुन्हे शाखेने मागे ठेवलेले काम आता संगमनेरच्या उपअधीक्षकांनी फत्ते केले असून 2020 साली जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दित जबरी चोरी आणि मारहाण, नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दित बेकायदा शस्त्र बाळगून दरोडा व 2021 साली सिन्नर (जि.नाशिक) पोलीस ठाण्याच्या हद्दित जबरी चोरीच्या दोन गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आणि अतिशय सराईत गुन्हेगार म्हणून पोलीस दप्तरी नोंद असलेल्या योगेश सिताराम पाडेकर व नागेश राजेंद्र काळे (दोघेही रा.वडाळा महादेव, ता.श्रीरामपूर) या दोघांनाही मोठ्या शिताफीने पकडले असून त्यांच्या चौकशीतून अन्य दोघांची नावेही समोर आली आहेत. त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी गेल्या चोवीस तासांत विविध ठिकाणी छापेही घातले आहेत, मात्र त्या दोघांचा अद्याप मागमूस लागलेला नाही.


पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या या धडाकेबाज कारवाईतून संगमनेर पोलिसांना बहुधा पहिल्यांदाच सोनसाखळी चोरट्यांची टोळी उघड करण्यात यश आले असून त्यातून एकाचवेळी केवळ संगमनेर शहर हद्दितीलच पाच गुन्हे उघड होवून त्यातील लाखों रुपयांचा मुद्देमाल हस्तगत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अर्थात पकडण्यात आलेले दोघे केवळ चोरीच्या घटना पूर्ण करीत होते, त्यांनी ओरबाडलेला मुद्देमाल ते ज्याच्याकडे जमा करीत होते तो टोळीचा सूत्रधार मात्र अद्यापही पोलिसांपासून दूर असून या घटनांमधील मुद्देमालही त्याच्याच ताब्यात आहे. पोलीस पथक त्या दोघांच्याही मागावर असून आज सायंकाळपर्यंत त्यांचा शोध लागण्याची शक्यता आहे.


वडाळा महादेव ठरतंय चोरट्यांचे आगार..
दोनच दिवसांपूर्वी अहमदनगरच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील दोघा सराईत गुन्हेगारांची नावे समोर आली होती. त्यातील संदीप दादाहरी काळे याच्या मुसक्या आवळून त्याला भिंगार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले, तर योगेश सिताराम पाडेकर हा मात्र पसार झाला होता. आता संगमनेर पोलिसांनी त्याच्यासह नागेश राजेंद्र काळे यालाही वडाळा महादेव येथूनच ताब्यात घेतले आहे. गेल्या दोन दिवसांत या गावातील ही तिसरी अटक आहे. त्यामुळे श्रीरामपूर पाठोपाठ आता वडाळा महादेव चोरट्यांचे आगार बनू पहात असल्याचे समोर येवू लागले आहे.

Visits: 183 Today: 2 Total: 1099196

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *