टाकळीभान येथील अवैध हातभट्टी दारु अड्डे उध्वस्त 1 लाख 28 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त; तिघे ताब्यात

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील टाकळीभान येथील गावठी हातभट्टी दारु अड्डे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने सोमवारी (ता.7) उध्वस्त केले आहे. या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 28 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत तिघांना ताब्यात घेतले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, उपविभागीय पोलीस अधिकारी मिटके यांना गुप्त बातमीदारामार्फत टाकळीभान येथे गावठी हातभट्टी दारु अड्डे व हातभट्टी दारु तयार होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र आरोळे, पोहेकॉ.सुरेश औटी, पोलीस शिपाई नितीन शिरसाट यांना छापा टाकण्याचे आदेश दिले. त्यांनी त्याठिकाणी छापा टाकून गावठी हातभट्टी दारु तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारु यांचा जागेवरच नाश केला.

तर लक्ष्मण परसराम बिरसने याच्याकडून 45 हजार 500 रुपयांचे 650 लिटर कच्चे रसायन व 1500 रुपयांची 15 लिटर तयार दारु, शांताबाई गणपत जाधव हिच्याकडून 42 हजार रुपयांचे 600 लिटर कच्चे रसायन व 1500 रुपयांची 15 लिटर तयार दारु आणि आशाबाई शिवाजी पवार हिच्याकडून 36 हजार 700 रुपयांचे 525 लिटर कच्चे रसायन व 1500 रुपयांची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारु असा एकूण एकूण 1 लाख 28 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई नितीन शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलिसांनी मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 (फ) (क) (ड) (ई) प्रमाणे वरील तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या अचानक झालेल्या छापेमारीमुळे टाकळीभान परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून, कारवाईचे महिलांकडून कौतुक होत आहे.

Visits: 131 Today: 2 Total: 1107237

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *