संगमनेरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उडाला बोजवारा! शाखा गेली अडगळीत; अवघ्या पाच कर्मचार्यांच्या खांद्यावर हजारो वाहनांचा भार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील प्रचंड वाहतुकीसह शहरातंर्गत वाढलेली प्रचंड रहदारी, नियोजनाच्या अभावाने अरुंद होत गेलेले अंतर्गत रस्ते आणि त्यात बेकायदा रिक्षाथांब्यांसह जागोजागी बोकाळलेली अतिक्रमणे, वाहनधारकांची बेशिस्ती यामुळे प्रगत शहरांच्या पंक्तीत मिरवणार्या संगमनेर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. त्यातच शहरासह संपूर्ण उपविभागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी यासाठी कार्यान्वित असलेल्या वाहतूक शाखेतील निम्म्याहून अधिक कर्मचार्यांचा पोलीस ठाण्यातील कामकाजासाठी वापर होवू लागल्याने शहराच्या गचाळ वाहतूक व्यवस्थेत आणखी भर पडली आहे. नूतन पोलीस अधीक्षक जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेबाबत गंभीर असले तरीही त्यांचे गांभीर्य मात्र अद्याप दृष्टीस पडले नसल्याने संपूर्ण संगमनेर उपविभागातील वाहतुकीचा फज्जा उडाला आहे.
संगमनेर शहर म्हणजे दोन महानगरांना एकमेकांशी जोडणार्या महामार्गासह उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाण्यासाठी महत्त्वाचा मार्ग समजल्या जाणार्या पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील एक प्रगत शहर. गेल्या काही दशकात येथील ऐतिहासिक बाजारपेठेच्या कक्षा रुंदावल्याने व त्यातच दळणवळणासारख्या संसाधनांचाही मोठ्या प्रमाणात विकास झाल्याने, या मार्गावरील वाहतूकही त्या प्रमाणात वाढली आहे. मात्र या वाहतुकीचे नियमन करण्यात संगमनेर शहर पोलीस सतत अपयशी ठरत असून सामान्य नागरिकांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. विशेष म्हणजे संगमनेर उपविभागासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा असूनही शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. शहरात वाहतुकीबाबत कोणतेही नियोजन नसल्याने अंतर्गत भागातही जागोजागी होणारी वाहतूक कोंडी सामान्यांसाठी मात्र डोकेदुखी ठरत आहे. वाहतूक शाखेसाठी स्वतंत्र कर्मचार्यांची नेमणूक असतानाही मोजक्या कर्मचार्यांकडून हजारो वाहनांचे नियमन केले जात असल्याने हे कर्मचारी त्यात अपयशी ठरत आहेत.
अगदी प्राचीन कालखंडापासून अमृतवाहिनीच्या काठावर वसलेल्या संगमनेरच्या बाजारपेठेचे महत्त्व वर्णिले गेले आहे. शिवकाळातही संगमनेरची बाजारपेठ वारंवार उल्लेखित झालेली आहे. येथून होणारा व्यापार त्या काळातही आसपासच्या जिल्ह्यांपर्यंत विस्तारलेला होता. त्यामुळे संगमनेरच्या बाजारपेठेला जिल्ह्यात वेगळे स्थान आहे. अगदी त्याकाळापासून नाशिक आणि त्याच्या आसपासचे जिल्हे व गुजरातमधून दक्षिणेकडे जाण्यासाठी संगमनेर, चंदनापुरी घाट, आळेफाटा, जुन्नर या मार्गांचा वापर झाल्याचे दाखले इतिहासात आढळतात. त्यामुळे ज्याप्रमाणे संगमनेरच्या बाजारपेठेला ऐतिहासिक महत्त्व आहे, त्याप्रमाणे पुणे-नाशिक या महामार्गालाही तेवढेच महत्त्व प्राप्त आहे.
दिवसेंदिवस या महामार्गावरील वाहतूक वाढल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाने रस्त्याचे चौपदरीकरण करुन वाहतुकीचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दशकांमध्ये ज्याप्रमाणे रस्त्यांची संख्या वाढली त्या प्रमाणात त्यावरुन धावणार्या वाहनांची संख्याही अनेक पटींनी वाढली आहे. त्यामुळे साहजिकच वाहतुकीचे नियमन, अपघात, रस्त्यांची अवस्था या गोष्टी वारंवार उद्भवतात आणि त्यातून जनक्षोभ निर्माण होतो. अशीच स्थिती सध्या संगमनेरात बघायला मिळत आहे. शहरातील अंतर्गत भागातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेली असल्याने वारंवार वाहतुकीचा खोळंबा होतो.
त्यामुळे नागरिकांना चौका-चौकात अडकून पडावे लागत आहे. सामान्य संगमनेरकरांना पोलिसांकडून रात्रीची सुरक्षित झोप आणि दिवसा शहरातील कोणत्याही भागात अनिर्बंध, विनाअडथळा वावर या दोनच गोष्टी अपेक्षित असतात. मात्र संगमनेर शहर पोलीस ठाणे संगमनेरकरांच्या या दोन्ही गोष्टी पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. एकीकडे महामार्गासह चौका-चौकात होणारी वाहतूक कोंडी आणि दुसरीकडे रात्रीच्या सुमारास होणार्या चोर्या आणि दुचाकी वाहने लांबविण्याचे प्रकार हेच सांगत आहेत.
तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख रंजनकुमार शर्मा यांनी अडगळीत गेलेल्या जिल्ह्यातील संगमनेर व श्रीरामपूर उपविभागाच्या वाहतूक शाखांना नवसंजीवनी दिली होती. त्यावेळी त्यांनी संगमनेरच्या उपशाखेला एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पंधरा पोलीस कर्मचारी आणि एक सरकारी वाहन असे बळ देऊन सुरळीत आणि अपघातमुक्त वाहतुकीची संकल्पना राबविण्याचा प्रयत्न केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ उंबरकर, पप्पू कादरी यांसारख्या अधिकार्यांनी या बळाचा योग्य वापर करुन संगमनेरच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्तही लावली होती.
मात्र त्यानंतर आलेल्या पोलीस अधीक्षकांनी वाहतूक शाखेचे नियंत्रण स्थानिक पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांकडे सोपविल्याने या शाखेतील सर्व कर्मचारी त्यांच्या नियंत्रणात आले. त्यातच अतिरिक्त मिळालेल्या या बळाचा वापर वाहतुकीसाठी होणे आवश्यक असताना त्यांनी या कर्मचार्यांवर पोलीस ठाण्यांतर्गत कामांसह गुन्ह्यांचे तपासही सोपविण्यात सुरुवात केली. त्याचा परिणाम पूर्वी एका अधिकार्यासह पंधरा कर्मचारी असलेल्या या शाखेतील अवघ्या पाच कर्मचार्यांवर राष्ट्रीय व राज्य महामार्गासह शहरातील संपूर्ण वाहतुकीची जबाबदारी आली.
पुणे-नाशिक महामार्गावरुन दररोज हजारों वाहनांची वर्दळ असते. शहराची अंतर्गत स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. दोन महानगरांना जोडणार्या महामार्गावरच असल्याने संगमनेरच्या बसस्थानकातही चोवीस तास राज्य परिवहन महामंडळांच्या बसेसची सतत गर्दी असते. शहरात सिग्नल व्यवस्था असली तरीही ती केवळ ठेकेदारीसाठीच उभारली गेली होती, सद्यस्थितीत त्यातील निम्मे सिग्नल आता गायबही झाले आहेत. त्यामुळे दिवसभर कर्मचार्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहूनच वाहतुकीचे नियमन करावे लागते. मात्र कर्मचार्यांची संख्या कमी केली गेल्याने रहदारीच्या प्रत्येक चौकात पोलीस हजर राहू शकत नसल्याने आहे त्या स्थितीत असंख्य अडचणी निर्माण झाल्या आहेत.
शहरांतर्गत वाहतूक हा स्थानिक पोलीस निरीक्षकांसाठी एकूण कामाचा एक भाग असल्याने त्यांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. वाहतुकीसोबतच त्यांना शहरातील कायदा व सुव्यवस्था, गुन्ह्यांचे तपास अशा विविध जबाबदार्याही पेलाव्या लागतात. त्यामुळे त्यांच्याकडून सुरळीत आणि सुरक्षीत वाहतुकीसाठी काही वेगळे होईल अशी अपेक्षा करणे गैर ठरत आहे. त्यामुळे पूर्वी वाहतूक शाखेतच असलेल्या मात्र त्यांची संख्या निम्म्याहूनही कमी झालेल्या अवघ्या पाच पोलीस कर्मचार्यांच्या खांद्यावर संगमनेर शहरातून होणार्या हजारो वाहनांच्या वाहतुकीचा भार असल्याने शहरांतर्गत वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या शहरातील प्रत्येक रस्त्यावर आणि चौका-चौकात बघायला मिळत आहे.
तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी अडगळीत गेलेल्या संगमनेर व श्रीरामपूर वाहतूक शाखांना नवसंजीवनी देताना प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह 15 कर्मचारी व सरकारी वाहन दिले होते. या बळाचा योग्य वापर करुन यापूर्वी स. पो. नि. गोपाळ उंबरकर व स. पो. नि. पप्पू कादरी या अधिकार्यांनी खूप चांगले काम करुन दाखवले. मात्र आता या वाहतूक शाखांचे नियंत्रण पुन्हा एकदा त्या-त्या ठिकाणच्या पोलीस निरीक्षकांकडे सोपविण्यात आल्याने जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेचा फज्जा उडाल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.