चार कोटी साठ लाख गमावल्यानंतरही दुखवटा हटेना! विलिनीकरण हा आमचा हक्कच; कामगारांना प्रतीक्षा ‘उच्च’ निर्णयाची..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
ऐन दिवाळीच्या दिनी आपल्या ‘दुर्धर’ मागण्या घेवून अचानक राज्यव्यापी संपाची हाक देवून राज्यपरिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या दुखवट्याचा आजचा 92 वा दिवस आहे. या कालावधीत राज्य सरकारने नानाविध प्रयत्न करुनही आणि संपात फूट पाडण्याचा प्रयत्न होवूनही कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असल्याने अद्यापही हा तिढा सुटलेला नाही. अर्थात ज्येष्ठनेते शरद पवार यांच्या हस्तक्षेपानंतर राज्यातील बहुतेक आगारातील तुरळक कर्मचारी कामावर परतलेही आहेत. मात्र संपावरील कर्मचार्‍यांची संख्या मोठी असल्याने राज्यातील लालपरीची चाके अद्यापही थांबलेलीच आहेत. जिल्ह्यातही अकरापैकी अवघ्या चार आगारातून तुरळक सेवा सुरु झाली असून संगमनेर आगारातून नगरला जाणार्‍या एकमेव बसशिवाय अन्य सर्व 52 बसेस उभ्या आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या या संपामुळे एकट्या संगमनेर आगाराचे पाच कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून येत्या 3 फेबु्रवारीरोजी या प्रकरणाचा निर्णय येण्याची शक्यता आहे, कर्मचार्‍यांना त्याचीच प्रतीक्षा असल्याने तोपर्यंत लालपरी पूर्ण क्षमतेने सुरु होण्याची शक्यता नाही.

कमी आणि अनियमितपणे मिळणारा पगार, अन्य शासकीय कर्मचार्‍यांच्या तुलनेत मिळणार्‍या सुविधांमधील भेदभाव अशा विविध आणि अगदी दुर्धर झालेल्या मागण्या घेवून गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर रोजी राज्य सरकारच्या परिवहन महामंडळाच्या अडीचशे आगारातील एकलाखाहून अधिक कर्मचार्‍यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली. दिवाळीच्या काळात धावणार्‍या बसेस म्हणजे महामंडळासाठी अर्थवाहीनीचे काम करीत असतात. मात्र त्याच कालावधीत हा संप पुकारला गेल्याने आधीच तोट्यात असलेल्या महामंडळाचे कंबरडे मोडले. आज अखेर महामंडळाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या दरम्यानच्या कालावधीत अनेक नाट्यमय घडमोडीही समोर आल्या आहेत.

विधीज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी कर्मचार्‍यांचा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयात नेवून कर्मचार्‍यांच्या मनात यशाची हवा भरली. त्या दरम्यान सरकारकडून कर्मचार्‍यांना भरीव पगारवाढ जाहीर करुन हा संप मिटवण्याचाही प्रयत्न झाला. मात्र कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम राहीले. कर्मचार्‍यांना कामावर परतण्यासाठी इशारे दिले गेले, कारवायांसाठी नोटीसाही बजावल्या गेल्या. मात्र कर्मचारी मागे हटले नाहीत. अखेर सरकारने अधिक कठोर होवून बडतर्फीच्या कारवाया सुरु केल्या. मात्र त्याचाही फारसा परिणाम होत नसल्याचे पाहून सरकारही हतबल झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली. या सर्व घडामोडीत ग्रामीण भागाची वाहिनी समजली जाणारी लालपरी उभीच राहिल्याने जनसामान्यांची गेल्या तीन महिन्यांपासून होणारी परवड पाहून आणि कर्मचार्‍यांच्या मागण्यांचाही सकारात्मक विचार व्हावा यासाठी ज्येष्ठनेते शरद पवार यांनी पुढाकार घेतला. त्यावर बहुतेक एस.टी.च्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी, कामगारांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहीले. सरकारने समिती स्थापन करुन कालबद्ध कार्यक्रमही जाहीर केला. सर्व संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी त्यांवर संमती दर्शवून संप मागे घेण्याची घोषणाही केली. मात्र तरीही संप सुरुच असल्याने त्यावर कोणत्याही संघटनांचे नियंत्रण राहीले नसल्याचेही स्पष्ट झाले आणि कामगारांना सरकारनंतर आता न्यायालयाच्या निर्णयाचीच प्रतीक्षा असल्याचेही स्पष्ट झाले.


या सगळ्यांचा फटका आधीच आजारी असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. अहमदनगर जिल्ह्यात महामंडळाचे एकूण 11 आगार आहेत, या सर्वांना मिळून जिल्ह्यात एकूण 585 बसेस आहेत. त्यासोबतच मालवाहतूक करणार्‍या बसेसची संख्याही 88 आहे. सध्या जिल्ह्यातील शेवगाव, तारकपूर, कोपरगाव व श्रीरामपूर या चार आगारातून तुरळक प्रमाणात बसेसच्या फेर्‍या सुरु झाल्या आहेत. मात्र उर्वरीत सात आगारातील बहुतेक कर्मचारी संपावरच असल्याने पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरु झालेली नाही. जिल्ह्यात एकूण 3 हजार 700 एस.टी. कर्मचारी आहेत. त्यातील 1 हजार 500 कर्मचारी कामावर परतले असून 2 हजार 200 कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत. संगमनेर बस आगारात एकूण 53 बसेस आहेत. त्यात दोन शिवशाही वातानुकुलित बससह दोन निमआराम व सहा माल वाहतूक बसेसचा समावेश आहे. आगारात काम करणार्‍या एकूण कर्मचार्‍यांची संख्या 341 असून त्यातील तीनशे कर्मचारी संपावर आहेत. उर्वरित कर्मचारी कार्यालयीन असून ते सुरुवातीपासून संपात सहभागी झालेले नाहीत. सरकारच्या आवाहनानंतर संपावरील दोघे कामावर परतल्याने संगमनेर आगारातून सकाळच्या सत्रात ‘संगमनेर ते नगर’ ही एकमेव फेरी सुरु करण्यात आली आहे. याशिवाय कोपरगाव, तारकपूर व सिन्नर येथून येणार्‍या बसेसशिवाय बसस्थानकाच्या परिसरात खासगी वाहनांचाच अधिक वावर असल्याचे दिसून येते.

संगमनेर बस आगारातून दररोज जवळपास शंभर फेर्‍या होत असतात. त्यातून महामंडळाला दैनिक पाच लाखांचे उत्पन्न मिळायचे. मात्र मागील तीन महिन्यांपासून आगारातील सर्व बसेस जागेवरच उभ्या असल्याने मिळणारे संपूर्ण उत्पन्न ठप्प झाले आहे. त्यामुळे सरळ हिशोबाने संगमनेर आगाराला आत्तापर्यंत 4 कोटी 60 लाखांचा फटका बसला आहे. या दरम्यान दिवाळीचा हंगाम आधि लग्न सराईचा काळही गेल्याने त्यातून मिळणारे अतिरिक्त उत्पन्न लक्षात घेता संगमनेर आगाराने आत्तापर्यंत पाच कोटीहून अधिक गमावले आहेत. आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या संगमनेर आगारातील जवळपास पन्नास कर्मचार्‍यांनी गेल्या गुरुवारी (ता.27) पदयात्रेने शिर्डीला जावून साईबाबांना आपल्या मागण्यांचे साकडेही घातले. आता या कर्मचार्‍यांचे लक्ष 3 फेब्रुवारीच्या न्यायालयीन निकालाकडे लागले आहे.

Visits: 121 Today: 1 Total: 1595317

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *