दोन वर्षांनंतर अभूतपूर्व उत्साहात संगमनेरकरांचे ‘सीमोल्लंघन’! मालपाणी उद्योग समूहाकडून रावणाचे दहन; तर, इनरव्हील क्लबचा वृक्षदान उपक्रम


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संक्रणाच्या अडथळ्याने गेली दोन वर्ष खोळंबलेल्या सार्वजनिक उत्सवांना बंधने हटल्यानंतर उधाण आल्याचे चित्र बुधवारी संगमनेरात पहायला मिळाले. येथील अकोले रस्त्यावरील मालपाणी उद्योग समूहाच्या कारखान्यात जावून दरवर्षी नागरिक शमी वृक्षाचे पूजन करुन सीमोल्लंघन करतात. गेल्या काही वर्षांपासून उद्योग समूहाकडून रावणाच्या प्रतिमेचे दहनही केले जाते. त्यानुसार यंदा जवळपास 32 फूट उंचीची रावणाची प्रतिमा तयार करण्यात आली होती. त्याचे दहन मालपाणी उद्योग समूहाच्या संचालकांच्या हस्ते करण्यात आले. यावर्षीच्या या उत्सवाचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे रचना मालपाणी यांच्या संकल्पनेतून इनरव्हील क्लबने यावर्षी सीमोल्लंघनासाठी आलेल्या नागरीकांना वृक्षदान करण्याचा अनोखा उपक्रम राबविला. या माध्यमातून शेकडों संगमनेरकरांना विविध प्रकारच्या फुलांची आणि फळांची झाडे वितरीत करण्यात आली.

संगमनेरात दरवर्षी नवरात्री उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. शहरातील विविध ठिकाणी असलेल्या देवींच्या मंदिरामध्ये दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रम व अनुष्ठानांचे आयोजन केले जाते. या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे विजयादशमीला संगमनेरकर नागरीक सीमोल्लंघनासाठी मालपाणी उद्योग समूहाच्या अकोले रस्त्यावरील कारखान्यात येतात. या ठिकाणी प्राचीन शमीचे झाड असून दसर्‍याच्या दिवशी त्याचे पूजन करण्याची येथील परंपरा आहे. त्यासाठी मालपाणी उद्योग समूहाकडून दरवर्षी मोठी तयारी केली जाते. अकोले रोड कारखान्याचा परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजविला जातो. कारखान्याच्या प्रवेशद्वारापासून ते शमीवृक्षापर्यंत आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या जातात.

अतिशय विस्तीर्ण आणि वृक्षराजीने नटलेल्या कारखाना परिसरात यावर्षी देवी-देवतांच्या भव्य व आकर्षक प्रतिमा उभारण्यात आल्या होता. त्यात प्रामुख्याने प्रभु श्रीरामचंद., लक्ष्मण व सीतामाता, मारुती-राम भेट, देव्यांच्या प्रतिकृती, गणपती बाप्पा, पांडुरंग-रुक्मिणीमाता, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारुढ प्रतिमा, स्वामी विवेकानंद अशा विविध प्रतिमा उभारुन तो परिसर अतिशय देखण्या पद्धतीने सजवून त्या भागात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सायंकाळी बरोबर साडेसात वाजण्याच्या सुमारास मालपाणी इंडस्ट्रिअल पार्कच्या परिसरात उभारलेल्या 32 फूटी रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी यांच्यासह मनीष, गिरीश, जय, यश व हर्ष मालपाणी यांची सपत्नीक उपस्थिती होती.

अतिशय हुबेहूब वाटावा अशा पद्धतीने तयार करण्यात आलेली रावणाची ही प्रतिमा मालपाणी उद्योग समूहातील बाळू राऊत व वर्क शॉपमधील त्यांच्या अन्य सहकार्‍यांनी तयार केली होती. बक्षुभाई दारुवाला यांच्यावतीने शाबीरभाई यांनी त्यात अतिशय आकर्षक दारुकाम केले होते. ओम गुरुदेव मंडप डेकोरेशनचे शुभम शिंदे यांनी या संपूर्ण परिसराची सजावट पूर्ण केली. मालपाणी उद्योग समूहाचे रमेश घोलप व मंगेश उनवणे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सांभाळले. उद्योग समूहाचे सुरक्षा अधिकारी भारत मोरे व त्यांच्या सहकार्‍यांनी सुरक्षेची जबाबादारी पेलली. रावण दहनाच्या कार्यक्रमाला जवळपास पंधरा हजारांहून अधिक जणांची उपस्थिती होती, त्यात महिलांची संख्या लक्ष्यनीय होती. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी या संपूर्ण उत्सवादरम्यान चोख बंदोबस्त ठेवला होता. दोन वर्षांच्या खंडानंतर साजर्‍या झालेल्या विजयादशमी उत्सवात संगमनेरकरांचा उत्साह अभूतपूर्व असल्याची प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी दिली.


गेल्या काही वर्षांपासून वृक्षदानाचे सातत्यपूर्ण कार्य करणार्‍या रचना मालपाणी यांनी यावर्षी इनरव्हील क्लबच्या सहकार्याने अनोखा उपक्रम राबविला. त्यांनी सीमोल्लंघनासाठी मालपाणी उद्योग समूहाच्या कारखान्यात येणार्‍या नागरिकांना विविध प्रकारच्या फुलांची व फळांची जवळपास पाच हजारांहून अधिक रोपे विनामूल्य वितरीत केली. यातून संगमनेरात वृक्ष चळवळ उभी करुन संगमनेरकरांना त्यात सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. पुढील वर्षी कुंड्यांमध्ये लावता येणारी पन्नास हजार फुलांची रोपे वितरीत करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

Visits: 96 Today: 1 Total: 1109875

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *