शिंगवे येथे बकर्‍या वाटपाच्या कारणातून भावाचा खून राहाता पोलिसांत सख्ख्या भावावर खुनाचा गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, राहाता
बकर्‍या वाटपावरुन झालेल्या जोरदार भांडणातून शिंगवे (ता.राहाता) येथे सख्ख्या भावाने दुसर्‍या भावाचा खून केला आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (ता.28) सायंकाळी 4 वाजता घडली आहे. याप्रकरणी राहाता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, जालिंदर रमेश मोरे व त्याचा भाऊ महेंद्र रमेश मोरे यांना दारुचे व्यसन होते. त्यांच्या आईवडिलांच्या 24-25 बकर्‍या आहेत. या बकर्‍यांच्या वाटणीवरून दोघांचे सतत भांडण व्हायचे. चार महिन्यांपूर्वी या दोघांचे भांडण झाले होते. यात जालिंदर याने महेंद्र यास जास्त मारहाण केली होती. त्यात महेंद्रचा पाय मोडला होता. तसेच दोघेही वारंवार आईवडिलांकडे पैसे मागून मारहाण करायचे.

दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी राजेंद्र बाबुराव मोरे यांना सायंकाळी 4 वाजता गावातीलच काबा हरिभाऊ पगारे यांनी सांगितले की, गावठाण जागेत असेलेल्या नवीन लक्ष्मी आई मंदिरासमोर तुझा चुलत भाऊ जालिंदर याचा खून झालेला आहे. ही माहिती मिळाल्यानंतर मोरे यांनी त्यांचा मित्र योगेश पगारे यास घटनास्थळी घेऊन गेले. त्यावेळी जालिंदर मोरे (वय 22) याच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून जागीच ठार केल्याचे निदर्शनास आले. मयत जालिंदर व त्याचा मोठा भाऊ महेंद्र यांनी शुक्रवारी सकाळी बकर्‍याच्या वाटणीवरून त्यांच्या आईवडीलांशी भांडणे करुन दोघेही दारु पिऊन दुपारपासून लक्ष्मी आई मंदिरासमोर आपापसांत जोरजोराने भांडण करीत होते. त्या भांडणातूनच जालिंदर याला महेंद्र याने तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर वार करुन ठार केले. याप्रकरणी मयत जालिंदरचा चुलत भाऊ राजेंद्र मोरे यांनी राहाता पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन महेंद्र रमेश मोरे याच्याविरुध्द गुरनं.35/22 भादंवि कलम 302 नुसार विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास साई मंदिर सुरक्षाचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी करीत आहेत.

Visits: 218 Today: 1 Total: 2168294

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *