आता श्रीरामपूर तालुक्याच्या लाचखोरीचे बिंग फुटले! निरीक्षकांसह दोघा कर्मचार्‍यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल; लाचखोरी चव्हाट्यावर..

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
दोन भावांमधील वादात एकाला मदतीचा हात देवून त्याच्याकडून दहा हजारांची लाच घेणार्‍या श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील दोघा कर्मचार्‍यांचा प्रताप उघड होवून 36 तासांचा कालावधी उलटायच्या आंतच आता तालुका पोलिसांनी आपली लक्तरे वेशीवर टांगली आहेत. पोलिसांची हप्तेवसुली उघड करणार्‍या दोन ऑडिओ क्लिपमधून तालुका पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांसह दोघा कर्मचार्‍यांची नावे समोर आली आहेत. या क्लिपमध्ये अधिकारी आणि एक कर्मचारी ‘तु वसुलीला का जातो’ या एकाच मुद्द्यावर दुसर्‍या एका कर्मचार्‍यांवर गुरकावत असल्याचे दिसून येतं. या ऑडिओ क्लिपने जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस अधीक्षक त्याकडे किती गांभिर्याने पाहतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रशासकीय नियुक्त्यांमध्ये नातेवाईक आणि हितसंबंधीतांच्या नियुक्तिचा राजकीय आग्रह वाढल्याने जिल्ह्यातील सर्वच विभागांची अवस्था अशीच बनली आहे.

गुरुवारी (ता.27) श्रीरामपूरातील दोन भावांच्या भांडणात एकाला साथ देवून बांधकाम पूर्ण करुन देण्याच्या बदल्यात 10 हजारांची लाच घेणार्‍या शहर पोलीस ठाण्यातील सुनील उत्तमराव वाघचौरे व शिपाई गणेश हरी ठोकळ या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिकच्या पथकाने पकडले. या कारवाईला जेमतेम 36 तासांचा कालावधी उलटायच्या आंतच आता श्रीरामपूर ग्रामीण पोलीस ठाण्यातील लाचखोरी समोर आली आहे. पोलीस निरीक्षकांनी नियुक्त केलेला वसुली कर्मचारी सोडून दुसरा एक कर्मचारी परस्पर अवैध धंदेवाईकांकडून वसुली करीत असल्याचे व त्यावरुन पहिल्या ऑडिओ क्लिपमधून खुद्द अधिकारी आणि दुसर्‍या क्लिपमधून साहेबांनी नियुक्त केलेला अधिकृत वसुली कर्मचारी ‘तू वसुलीला का जातो’ या एकाच मुद्द्यावरुन त्याला झापत असल्याचे स्पष्ट ऐकू येते.

सुरुवातीला संबंधित अधिकारी ‘राऊत’ नावाच्या व्यक्तिला फोन करुन ‘कोठे आहात’ अशी विचारणा करतात. त्यानंतर थेट मुद्द्याला हात घालीत ‘तुम्ही पैसे जमा करु लागलेत का?’ इथपर्यंत संभाषणाची पातळी वरती चढली. त्यावर राऊत म्हणतो; ‘मला वैराळने सांगितले आहे, त्यामुळे मी जात नाही.’ त्यावर अधिकारी म्हणतात; ‘तुम्हाला ते काम दिलेले नाही, मग तुम्ही का जाता?’. यावर राऊत नावाने बोलणारा तो कर्मचारी नाही सर.. नाही सर.. म्हणत ‘तुम्ही वैराळला का पाठवता?’ असा प्रश्न विचारताच त्या अधिकार्‍याच पारा चढतो. आणि दरडावणीच्या स्वरात ते म्हणतात ‘तु कोण मला सांगणार? *** सारखा बोलू नकोस, समोर ये तुला सांगतो.’ असे म्हणताना ऐकू येते.

मग राऊत म्हणतो ‘तो मला शिव्या देतो, माझी लायकी काढतो.’ त्यावर तो अधिकारी म्हणतो, तुमचे वैयक्तिक वाद तुम्ही बघा. तू त्याच्या उरावर जावून बस, मला कशासाठी मधे ओढतो. त्यावर राऊत म्हणतो, मी एस. पी. साहेबांकडे त्याचा रिपोर्ट करणार आहे, माझ्याकडे क्लिप आहे. त्यावर अधिकारी त्याला समोर येवून बोलण्याची सूचना करतात आणि ही क्लिप संपते. दुसर्‍या ऑडिओ क्लिपमध्ये संतापलेला राऊत कथीत वैराळ नावाच्या इसमाला फोन करतो. दोघांच्या संभाषणात राऊत वसुलीला जातो, याची तक्रार अनेकांनी केल्याचे वैराळ त्याला सांगताना दिसून येते. तू शांत बसून रहा, तुला चहा-पाण्याला देत जाईल असे वैराळ राऊतला म्हणतो. आपल्याला तेच हवे होते असे राऊत म्हणतो. कोणात किती दम, कोणाचा कसा स्वभाव, येतो का रेड मारायला? आहे का हिंमत असे इकडंच तिकडंच बोलून झाल्यावर राऊत टोचून म्हणतो ‘तुमचा श्रीरामपूरवर शिक्का पडलाय.’ त्यावर वैराळ म्हणतो ‘का? तुम्ही नाही का? तुम्ही तर येथील स्थानिक आहात.’ असे म्हणत खुशाली सांगत ही क्लिप संपते.

या दोन्ही क्लिप श्रीरामपूर पोलिसांमध्ये वाढलेल्या हप्तेखोरीचे प्रदर्शन घडवणार्‍या आहेत. जिल्ह्यात राजकीय दबावातून आपल्या नात्यातील अथवा हितसंबंधातील अधिकार्‍यांची नियुक्ती करवून घेण्यासाठी राजकीय बळाचा वापर होत असल्याने त्यातून सर्वच विभागाच्या प्रमुखांना काम करणं अवघडं होवून गेलं आहे. जिल्ह्यात अशी एकामागून एक प्रकरणं समोर येत असतांना त्यात आता श्रीरामपूरने सरशी घेतल्याने नात्यागोत्यांमुळे बिघडलेली कायदा व सुव्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हा कथीत दबाव झुगारुन पोलीस प्रशासनाला कठोर संदेश देण्याची गरज निर्माण झाली आहे. अवघ्या 36 तासांत एकाच तालुक्यात घडलेल्या या दोन घटना श्रीरामपूर पोलिसांची लक्तरे टांगणार्‍या असून नागरिकांना याप्रकरणी कठोर कारवाईची अपेक्षा आहे.


अहमदनगर जिल्हा पोलीस दलाला ऑडिओ बॉम्ब नवा नाही. यापूर्वी नेवासा पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षकांशी झालेले संभाषण, अकोले पोलीस ठाण्यातील दोघा कर्मचार्‍यांची एकमेकांवर चिखलफेक, नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक व वाळू तस्करातील संभाषण आणि आता कथीत श्रीरामपूर तालुका पोलीस निरीक्षकांसह दोघा कर्मचार्‍यातील संभाषणाची क्लिप यातून पोलीस दलात वाढलेली लाचखोरी समोर आली आहे. पालीस अधीक्षकांनी मागील बहुतेक सर्वच प्रकरणात संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या दोन दिवसांतील प्रकरणांबाबत आता ते काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Visits: 216 Today: 2 Total: 1106286

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *