नगर-सावळीविहीर महामार्गाची दुरवस्था हटण्याचे नाव घेईना! खोदलेल्या साईटपट्ट्या अन् अर्धवट ठिगळे दिलेला रस्ता ठरतोय डोकेदुखी


नायक वृत्तसेवा, राहाता
गेल्या पाच वर्षांत तीन सरकारे, रस्त्याचे तीन विभाग व काम करणारे तीन कंत्राटदार बदलले तरीही नगर-सावळीविहीर महामार्गाची दुरवस्था हटण्याचे नाव घेईना. निविदा होऊन जवळपास सहा महिने उलटून गेले मात्र अद्यापही महामार्गाचे काम सुरु न झाल्याने या पावसाळ्यातही रस्ता पूर्ण होईल अशी शक्यता वाटत नाही. खोदलेल्या साईटपट्ट्या अर्धवट ठिगळे दिलेला खड्डेमय रस्ता प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

नगर-सावळीविहीर महामार्ग सुरुवातीला जागतिक बँक प्रकल्पाकडे होता. त्यानंतर चौपदरीकरणासाठी सुप्रीम इन्फ्रांस्ट्रक्चर या खासगी कंपनीकडे काम आले. उच्च न्यायालयाने टोल बंद केल्याने हा ठेकेदार मधेच पळाला. त्यानंतर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला असून अशा तीन विभागांमधून फिरलेला, मात्र कधीच चांगल्या दर्जाचे काम न झाल्यामुळे प्रवाशांसाठी कायमच मृत्यूचा सापळा बनलेला आहे.

दरम्यानच्या काळात राज्यातही गेल्या साडेचार वर्षात सुरुवातीला पवार-फडणीस सरकार त्यांनतर मविआ सरकार आले. त्यानंतर वर्षभरापूर्वी राज्यात पुन्हा शिंदे फडणीस सरकार आले. साडेचार वर्षात राज्यात तीन सरकारं आले. मात्र या रस्त्याच्या बाबतीत अद्यापही ठोस निर्णय न झाल्याने पुरते वाटोळे झाले आहे. एवढेच काय कमी होते म्हणून गेल्या चार-पाच वर्षात या रस्त्याच्या कामासाठी नियुक्त केलेले तीन ठेकेदारही काम अर्धवट सोडून पळाले आहेत. यामध्ये सुरुवातीला राज्य महामार्गाकडे रस्ता असताना सुप्रीम इन्फास्ट्रक्चर कंपनीने रस्ता अर्धवट सोडून पलायन केले. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. नंतर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला. या विभागाकडून रस्त्याची निविदा देण्यात आली. मात्र साईडपट्ट्या खोदून व बर्‍याच ठिकाणी एक बाजूचा रस्ता खोदून ठेवून काम अर्धवट सोडून हा दुसराही कंत्राटदार पळून गेला.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून रस्त्यावर प्रचंड अपघात घडत आहेत. अनेकांना यामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले. विभागाने गेल्या वर्षी या कामासाठी जवळपास पावणे सातशे कोटीची निविदा काढली होती. रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनीने ही निविदा घेतली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला या कामाची निविदा अंतिम करण्यात आली होती. या प्रक्रियेला जवळपास सहा महिने उलटून गेलेले आहेत. अद्यापही संबंधित कंत्राटदाराने महामार्गाचे काम सुरू केले नाही. हा तिसरा कंत्राटदार कधी काम सुरु करणार व त्या कामाची पूर्तता कधी करणार याकडे प्रवांशाचे लक्ष लागून आहे. मात्र सुरु असलेल्या पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला खोदून ठेवलेल्या साईडपट्ट्या व रस्त्यावरील मोठमोठे खड्डे प्रवाशांचा अंत पाहत असून प्रवाशांना जीव धोक्यात घालूनच मार्ग काढावा लागत असल्याचे चित्र आहे.

Visits: 16 Today: 1 Total: 114532

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *