महसुली उत्पन्नात संगमनेर तालुक्याने मोडला आपलाच विक्रम! तहसीलदार अमोल निकम; बावीस कोटी वीस लाख रुपयांची विक्रमी वसुली..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शेतसारा, अकृषक कर, नजराणे यासह गौणखनिजाची रॉयल्टी आणि दंडातून संगमनेरचा महसूल विभाग यंदाही मालामाल झाला असून तालुक्याने वसुलीचा नवा विक्रम केला आहे. यावर्षी तालुक्याच्या दहाही महसुली मंडलातून विक्रमी 22 कोटी 20 लाख रुपयांचा महसूल जमा झाला असून सह ही रक्कम ठरल्या उद्दिष्टापेक्षा एकोणतीस टक्क्यांहून अधिक आहे. संगमनेरच्या महसूल विभागाने गेल्या वर्षीचा आपलाच विक्रमही मोडीत काढला असून यंदा 16 टक्के अधिक वसुली केल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.


संगमनेर तालुका महसुली विभागाला सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 15 कोटी 69 लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. आज अखेर तालुक्याने निश्‍चित उद्दिष्टांच्या कितीतरी पुढे जावून तब्बल 22 कोटी 20 वसुली केली आहे. ही रक्कम तालुक्याला मिळालेल्या उद्दिष्टापेक्षा 6 कोटी 51 लाख रुपयांनी अधिक आहे. कोविडचे सावट कायम असतांनाही गेल्यावर्षी संगमनेरच्या महसूल विभागाने निश्‍चित उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल जमा केला होता.


महसूली उत्पन्नात संगमनेर तालुक्याच्या दहा मंडलातून यंदा जमीन महसूल वसुली, बिनशेती सारा, अनधिकृत अकृषक कर, नजराणा प्रकरणे, मोबाईल टॉवर व इतर करातून विक्रमी सात कोटी 70 लाख रुपयांचा भरणा झाला. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही गौणखनिजाने राज्याच्या तिजोरीत मोठी भर घातली आहे. गौणखनिज परवाने, त्याची अवैध वाहतूक व उपसा या माध्यमातून वर्षभरात 14 कोटी 93 लाख रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.


संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे गेल्यावर्षी प्रमाणेच याही वर्षी अधिक जोमाने काम करुन शासनाच्या उत्पन्नात अधिक भर घालता आली. विभागातील सहकारी अधिकारी नायब तहसीलदार गणेश तळेकर, नायब तहसीलदार (महसूल) उमाकांत कडनोर, शिरस्तेदार श्रीकांत लोमटे, अव्वल कारकून महेश खरपूडे, महसूल सहाय्यक अंजना पवार, सर्व मंडलाधिकारी, तलाठी, कोतवाल व कार्यालयीन कर्मचार्‍यांच्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्याने ही कामगिरी केल्याची प्रतिक्रिया तहसीलदार अमोल निकम यांनी यावेळी दिली.

Visits: 2539 Today: 7 Total: 1983795

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *