अहमदनगर जिल्हा परिषदेत 144 कर्मचारी बाधित तेरा पंचायत समित्यांमध्ये 111 कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा

नायक वृत्तसेवा, नगर
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासह पंचायत समित्यांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे काटेकोर पालन केले जात असले, तरी कोरोनाने सर्व कार्यालयांमध्ये शिरकाव केलेला आहे. शुक्रवारपर्यंत (ता.21) एकूण 144 जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात 33 जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. यामध्ये आरोग्य विभागाचे एकूण आठ कर्मचार्‍यांचा समावेश आहे. त्या खालोखाल पाणी पुरवठा विभागात बाधितांची संख्या आढळून आलेली आहे. या विभागात एकूण सात कर्मचारी बाधित आढळलेले आहेत. जिल्हा परिषदेतील एकूण सतरा विभागापैकी ग्रामपंचायत विभाग, लघु पाटबंधारे विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग, मग्रोरोहयो कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या कार्यालयात कोरोनाने शिरकाव केलेला नाही. चौदा पंचायत समित्यांपैकी 13 पंचायत समित्यांमध्ये आजअखेर 111 कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झालेली आहे.

चौदा पंचायत समित्यांमध्ये नगर पंचायत समितीत कर्मचारी बाधित होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. नगर पंचायत समितीत आजअखेर एकूण 22 जण बाधित आढळून आलेले आहेत. त्या खालोखाल जामखेड पंचायत समितीत 21 बाधित आढळून आलेले आहेत. तिसर्‍या कर्मचार्‍यांचे रुग्ण संगमनेर पंचायत समितीत आहेत. संगमनेरमध्ये 16 कर्मचारी बाधित आहेत. श्रीगोंदा पंचायत समितीत अद्यापही कोरोनाने शिरकाव केलेला नाही.

जिल्हा परिषदेसह सर्वच पंचायत समित्यांमधील परिस्थितीचा दैनंदिन आढावा घेतला जात आहे. बाधित आढळून आलेल्या सर्वांचीच प्रकृती स्थिर आहे.
– संदीप कोहिणकर (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन)

Visits: 15 Today: 1 Total: 117019

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *