‘पाटी’ न लावताही व्यवसाय यशस्वी झाला पाहिजे! मराठी पाट्यांबाबत युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबेंचे लक्षवेधी ट्वीट

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील दुकाने आणि आस्थापनांवर ठळक अक्षरात मराठी पाट्या लावण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयावर राज्यातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना आणि मनसे यांच्यात यावरून श्रेयवाद सुरू आहे, तर काही व्यापार्‍यांनी याला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या एका युवा नेत्याने यासंबंधी वेगळे मत व्यक्त केलं आहे. ‘पाटी’ न लावताही व्यवसाय यशस्वी झाला पाहिजे, असं ट्वीट युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केलं आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी (ता.13) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेण्यात शिवसेनेचा पुढाकार आहे. यावर अन्य पक्षांकडून प्रतिक्रिया आलेल्या असल्या तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून मात्र अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. अर्थात महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून त्यांचा या निर्णयाला पाठिंबा असणार, हे गृहित धरलेलं जात आहे. असं असले तरी काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांनी यासंबंधी केलेलं एक ट्वीट लक्षवेधी ठरत आहे. त्यातून त्यांनी या निर्णयाचे थेट समर्थन किंवा विरोधही केलेला नाही. मात्र, यासंबंधी काँग्रेसचे वेगळे मत असल्याचं मात्र ते सूचवू इच्छित असल्याचं दिसून येते.

ट्विटमध्ये सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे की, पाटी न लावताही व्यवसाय यशस्वी झाला पाहिजे. त्यासाठी हवे उत्तम, दर्जेदार उत्पादने, व्यवसायात कल्पकता व नाविन्य, मानवी संसाधनांचे योग्य नियोजन, उत्तम सेवा, योग्य, स्पर्धात्मक किंमत, व्यवहारिकता व आर्थिक नियोजन, ‘ग्राहक हाच परमेश्वर’ ही भावना, असं तांबे यांनी म्हटलं आहे. यावरून दुकानाची पाटी कोणत्या भाषेत हवी, याला फारशी किंमत नसल्याचंच ते सूचित तर करत नाहीत ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Visits: 17 Today: 1 Total: 114810

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *