दूध कंपन्यांचे ऑडिट करून दूध उत्पादकांची लूट वसूल करा! दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेची मागणी

नायक वृत्तसेवा, अकोले
लॉकडाऊनचा गैरफायदा घेत खासगी दूध कंपन्या व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर प्रतिलिटर 10 ते 18 रुपयांनी पाडले आहेत. लॉकडाऊनपूर्वी शेतकर्‍यांना प्रतिलिटर दुधासाठी 30 ते 38 रुपये दर मिळत होता. लॉकडाऊन जाहीर होताच टप्प्याटप्प्याने हे दर संघटितरीत्या पाडण्यात आले असून ते 20 ते 22 रुपये प्रतिलिटरवर आणण्यात आले आहेत. खासगी दूध कंपन्या व सहकारी दूध संघांनी संघटितरीत्या लॉकडाऊनचा बाऊ करून हे दर पाडले असून यातून अमाप नफा कमविला आहे. राज्य सरकारने याची गंभीर दखल घेऊन दूध कंपन्यांचे ऑडिट करून दूध उत्पादकांची लूट वसूल करावी, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेने केली आहे.

राज्यात प्रतिदिन 1 कोटी 30 लाख लिटर दुधाचे संकलन होते. यापैकी 40 लाख लिटर दूध पावडर बनविण्यासाठी प्रक्रिया उद्योगात वापरले जाते. उर्वरित 90 लाख लिटर दूध, पाऊच पॅकिंगद्वारे घरगुती वापरासाठी वितरित होते. शहरांमध्ये हॉटेल व चहाची दुकाने बंद असल्याने काही प्रमाणात दुधाची मागणी घटली आहे, मात्र घरगुती दुधाचा वापर बिलकुल कमी झालेला नाही. 30 ते 40 टक्के दूध अतिरिक्त ठरावे अशी बिलकुल परिस्थिती नाही. प्रतिलिटर दुधाचे दर 10 ते 18 रुपयाने पाडावे अशी कोणतीच आणीबाणी दूध क्षेत्रात निर्माण झालेली नाही. असे असताना मागणी घटल्याने दुधाचा महापूर आला अशी अत्यंत चुकीची आवई उठवून दूध कंपन्यांनी शेतकर्‍यांना लुटले आहे.

त्यामुळे राज्य सरकारने या लुटमारीची तातडीने दखल घ्यावी. सर्व खासगी दूध कंपन्या व सहकारी दूध संघाचे लॉकडाऊन काळात दूध खरेदी व विक्रीचे ऑडिट करावे. कंपन्यांनी प्रत्यक्षात याकाळात किती दूध काय दराने खरेदी केले व किती दराने विकले याची वस्तुनिष्ठ आकडेवारी राज्य सरकारने प्राप्त करून घ्यावी व याआधारे नक्की राज्यात किती दूध अतिरिक्त ठरले होते व त्यासाठी किती भाव कमी करणे अपेक्षित होते याबाबत सखोल चौकशी करावी. अवास्तव दर पाडणार्‍यांवर या माध्यमातून कठोर कारवाई करावी. शेतकर्‍यांची या माध्यमातून कंपन्या व दूध संघांनी केलेली लूट वसूल करून शेतकर्‍यांना परत करावी अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेने केली आहे.

आगामी काळात अशी लूटमार होऊ नये यासाठी खासगी व सहकारी दूध संस्थांना लागू असेल असा लूटमार विरोधी कायदा करावा, दूध क्षेत्राला 80-20 चे रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे, दुधातील भेसळीवर कठोर निर्बंध आणणार्‍या उपाययोजना कराव्यात, तसेच अनिष्ट ब्रँड वॉर व लूटमार रोखण्यासाठी राज्यात एक राज्य एक ब्रँडचे धोरण राबवावे अशा मागण्या किसान सभेचे डॉ.अशोक ढवळे, जे. पी. गावित, किसन गुजर, डॉ.अजित नवले, डॉ.उदय नारकर, उमेश देशमुख, सिद्धप्पा कलशेट्टी, नाथा शिंगाडे, अमोल वाघमारे, माणिक अवघडे, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे यांसह उत्पादकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *