नेवाशात एका कुटुंबावर दुसर्या कुटुंबाकडून हल्ला! चिठ्ठी प्रकरण; पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील मडकी गावात एक विवाहित पुरुष एका विवाहित महिलेच्या घरात अश्लील मजकूर लिहिलेल्या चिठ्ठ्या टाकायचा. एकदा तिने त्याला खिडकीतून चिठ्ठी टाकताना पाहिले आणि आपल्या पतीला सांगितले. पती त्या पुरुषाकडे विचारणा करण्यासाठी गेले असता त्याने, त्याच्या पत्नीने या पीडित दाम्पत्यावरच हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेतील हल्ला करणार्या आणि धमकी देणार्या तिघांविरुद्ध नेवासा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्ती भानुदास वरकड, विमल निवृत्ती वरकड व भरत वरकड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी यातील फिर्यादी महिलेस आणि तिच्या पतीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तसेच हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्वजण एकाच गावातील आणि जवळच राहणार आहेत.
नेवासा तालुक्यातील मडकी गावात हे दाम्पत्य राहते. गेल्या चार-पाच महिन्यांपासून महिलेच्या घरात अश्लील मजकूर लिहिलेल्या चिठ्ठ्या येत होत्या. याचा त्या महिलेला त्रास होत होता. एक दिवस खिडकीतून चिठ्ठी टाकताना महिलेने निवृत्ती मरकड याला पाहिले. तो आधीपासूनच महिलेवर वाईट नजर ठेवून होता. त्यानेच चिठ्ठी टाकल्याची खात्री झाल्यावर महिलेने हा प्रकार पतीला सांगितला. त्यांनी वरकड याच्या घरी जाऊन यासंबंधी विचारणा केली. याचा राग येऊन त्याने हातात खोरे घेऊन अंगावर धावून आला. तर भारत वरकड हातात काठी घेऊन मारण्यासाठी धावला. तसेच विमल निवृत्ती वरकड यांनी या दाम्पत्यास शिवीगाळ केली. मारहाण करण्यासाठी त्यांच्या अंगावर हे सर्वजण धावून गेले. जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत दाम्पत्याने पोलीस ठाणे गाठले. तेथे पोलिसांना घडला प्रकार सांगितला. यासंबंधी पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.