विरोधकांच्या सोबतीने पंचायत समितीचा कारभार करणार ः डॉ. मुरकुटे न्यायालयीन लढाईनंतर डॉ. वंदना मुरकुटेंनी स्वीकारला सभापतीपदाचा पदभार

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
सात महिन्यांचा राजकीय व न्यायालयीन लढा जिंकल्यानंतर अखेर डॉ. वंदना मुरकुटे यांनी सोमवारी (ता.6) श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती पदाचा कारभार हाती घेतला.

श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती संगीता शिंदे यांच्या याचिकेविरोधात उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयासह जिल्हा प्रशासन व ग्रामविकास मंत्रालयात गेलेल्या कायदेशीर लढाईत अखेर डॉ. वंदना मुरकुटे यांना यश आले. यानिमित्ताने आमदार लहू कानडे यांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या सभागृहात सोवमारी सायंकाळी नवनियुक्त सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांचा सत्कार केल्यानंतर फटाके फोडून व गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात, काँग्रेसचे तालुध्यक्ष अरुण नाईक, विजय शिंदे, अशोक कानडे, माऊली मुरकुटे, अॅड. समीन बागवान, सतीश बोर्डे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सभापतीपदी प्रातांधिकारी अनिल पवार आणि गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस यांनी डॉ. वंदना मुरकुटे यांची निवड घोषित केली. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास डॉ. मुरकुटे यांनी पंचायत समितीच्या दालनात जावून सभापती पदाची सूत्रे हाती घेतली.

त्यावेळी आयोजित विजयी सभेत सत्काराला उत्तर देताना डॉ. वंदना मुरकुटे म्हणाल्या, संविधानामुळे आपल्याला सभापदी पद मिळाले. आज महापरिनिर्वाण दिन असल्याने मिळालेला विजय डॉ. बाबासाहेबांना अर्पण करते. आपल्या राजकीय प्रवासात (स्व.) जयंत ससाणे आणि (स्व.) बकाल साहेबांना कधीही विसरणार नाही. त्यांच्यामुळे आपल्याला राजकारणात येण्याची संधी मिळाली. तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश आदिक आणि अॅड. अजित काळे यांच्या शेतकरी संघटनेची मोलाची साथ मिळाल्याने आपला विजय झाला. ज्येष्ठांचे मार्गदर्शन, अधिकारी व पदाधिकार्यांची मदत घेवून विरोधकांच्या सोबतीने पंचायत समितीचा कारभार करणार आहे. सोबत असलेल्या लोकांसह विरोधकांचे देखील आभार. कारण विरोधकांच्या विरोधामुळेच आपल्याला मोठे होण्याची संधी मिळाल्याचे डॉ. मुरकुटे यांनी मत व्यक्त केले. अॅड. समीन बागवान यांनी सूत्रसंचालन केले. विष्णूपंत खंडागळे यांनी आभार मानले.

सभापतीपदाची लढाई नीती विरुद्ध अनीतीची झालेली होती. अखेर नैतिकतेच्या आधारे लढाईमध्ये कायद्याचा विजय झाला. मिळालेल्या संधीचे सभापती डॉ. मुरकुटे यांनी सोने करावे. राजकारणात अभ्यासू आणि बुद्धीमान लोकांची कमरता आहे. निवडणूक लढवून आमदार होणे सोपे आहे. परंतु आमदार होवून लोकांची कामे करणे अवघड आहेत. डॉ. मुरकुटे यांनी सभापती झाल्यानंतर त्यांनी लोकांची कामे करावी. राजकारणात केवळ पद महत्वाचे नसतात. त्यापेक्षाही लोकांची कामे करणे अधिक महत्वाचे असतात.
– लहू कानडे (आमदार-श्रीरामपूर)
