डोळासण्याच्या काळभैरव मंदिरावर चोरट्यांचा दुसर्यांदा हल्ला! पोलिसांना पाहून दानपेटी सोडली; पठारावर मात्र चोरट्यांचा हैदोस कायम

नायक वृत्तसेवा, घारगाव
वाळूतस्करी आणि अवैध धंद्यांसाठी नंदनवन ठरलेल्या पठारभागात आता चोरट्यांचा हैदोस सुरु झाला आहे. गेल्या दोन दिवसांतच घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात चोरट्यांनी जवळपास डझनभर ठिकाणी चोरीचे प्रयत्न केले असून त्यातून लाखो रुपयांचा मुद्देमाल पळविला आहे. आता चोरट्यांनी लोकांच्या धार्मिक श्रद्धेलाच हात घालायला सुरुवात केली असून गेल्या दोन दिवसांत पठारावरील दोन मंदिरांच्या दानपेट्या पळविण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातील आज पहाटेच्या घटनेत डोळासणे येथील काळभेरवाच्या मंदिराचे दरवाजे तोडून चोरट्यांनी मंदिराची दानपेटी उचलून नेली, मात्र त्याचवेळी घारगाव पोलिसांचे गस्ती वाहन पोहोचल्याने चोरट्यांनी दानपेटी आणि चोरुन आणलेली बुलेट सोडून तेथून पळ काढला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या डोळासणेच्या काळभैरव मंदिरात आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास सदरची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या सभामंडपाच्या जाळीचे प्रवेशद्वार तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर आतील बाजूचा लाकडी दरवाजाही चोरट्यांनी तोडला व आत ठेवलेली दानपेटी उचलून पुणे-नाशिक महामार्गावर आणली. यावेळी रस्त्याच्या लगत असलेल्या एका भाजी विक्रेत्याच्या पत्र्याच्या शेडचा आधार घेवून चोरट्यांनी ती दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी घारगाव पोलिसांचे गस्ती वाहन त्याठिकाणी आले. पोलिसांचे वाहन येत असल्याचे पाहून चोरट्यांनी दानपेटी तेथेच टाकून धूम ठोकली.

यावेळी गस्ती वाहनात असलेले सहाय्यक फौजदार राजू खेडकर व चालक संतोष फड यांनी सदर पत्र्याच्या शेडमध्ये जावून पाहिले असता त्यांना तेथे काळभैरव मंदिरातील दानपेटी दिसली. त्यावरुन त्यांनी डोळासण्याचे सरपंच दिनकर काकड यांना फोन करुन माहिती दिली. काकड यांनी गावचे पोलीस पाटील राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासह शरद काकड, संजय व सुनील सूर्यवंशी यांना याबाबत माहिती देवून महामार्गालगतच्या शेडमध्ये धाव घेतली. यावेळी दोन्ही पोलीस कर्मचार्यांनी सदरची दानपेटी पुन्हा घेवून जाण्यास सांगितले व त्यांनी सरकारी वाहनासह त्या चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधाराचा फायदा घेवून चोरटे पसार होण्यात यशस्वी ठरले.

त्यानंतर दोन्ही पोलीस कर्मचारी पुन्हा डोळासणे येथे आले. तोपर्यंत गावकर्यांनी चोरट्यांनी उचलून नेलेली दानपेटी ट्रॅक्टरद्वारे पुन्हा मंदिरात नेवून ठेवली होती. यावेळी त्या पत्र्याच्या शेडमध्ये एक बुलेट आढळून आली. ती चोरीचीच असण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी ती ताब्यात घेवून घारगाव पोलीस ठाण्याच्या आवारात लावली. या प्रकरणी वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. दोन वर्षांपूर्वी याच मंदिराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी देवाच्या डोक्यावरील छत्रचामरासह चांदीचे दागिने चोरुन नेले होते. त्या प्रकरणाचा अद्यापही तपास लागलेला नसताना आता चोरट्यांनी पुन्हा एकदा पठारभागातील मंदिरांना लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

मागील चार दिवसांपासून पठारभागात चोरट्यांनी अक्षरशः हैदोस घातला असून अवैध व्यावसायिकांसह आता चोरट्यांवरही पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे दिसू लागले आहे. दोनच दिवसांपूर्वी बुधवारी (ता.12) पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी खंदरमाळचे सरपंच शिवाजी फणसे यांचे घर फोडून 1 लाख 38 हजारांच्या रोकडसह तब्बल 1 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला होता. त्याच रात्री त्याच चोरट्यांनी नांदूरमध्येही धुमाकूळ घालीत एकाचवेळी चार घरे फोडली व सोन्या-चांदीचे दागिने लांबविले. विशेष म्हणजे खंदरमाळ आणि नांदूर येथील कार्यभाग उरकल्यानंतर या चोरट्यांनी घारगाव येथील उपडाक घर फोडून तेथील तिजोरीही लांबविली.

साधारण दोन महिन्यांपूर्वी म्हसवंडी येथील काही बंद असलेली घरे फोडून चोरट्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली होती. तेव्हाच पठारावरील नागरिकांनी घारगाव पोलिसांकडे चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. मात्र गेल्या काही वर्षात घारगाव पोलीस ठाणे म्हणजे केवळ घटनांची नोंद करणारे ठिकाण म्हणून समोर आल्याने ना नागरिकांच्या मागण्यांकडे लख्य दिले गेले, ना पठारावरील चोर्या थांबल्या. त्याचीच परिणीती गेल्या चार दिवसांत चोरट्यांनी जवळपास डझनभर घरांना व आता तर हजारों लोकांची श्रद्धा असलेल्या देवालयांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पठारभागात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.

गेल्या काही वर्षात 46 गावांचा समावेश असलेला पठारभागात वाळूतस्करी आणि अवैध व्यवसायांचे नंदनवन म्हणून पुढे आले आहे. पोलिसांच्या अर्थपूर्ण तडजोडीतून पठारवरील अवैध व्यावसायिक पोलिसांपेक्षाही वरचढ झाल्याचे दिसत असताना आता एकामागून एक चोरीच्या घटना घडू लागल्याने घारगाव पोलिसांची निष्क्रियता ठळकपणे समोर येवू लागली आहे. विशेष म्हणजे सलग दोन दिवस चोरीच्या घटना घडल्यानंतर चोरट्यांनी पूर्वीच्याच चोरीचा तपास नसलेल्या डोळासणे येथील काळभैरवनाथांचे मंदिर पुन्हा एकदा लक्ष्य केले. सुदैवाने त्याचवेळी पोलिसांचे गस्ती वाहन दिसल्याने चोरट्यांचा दानपेटी फोडण्याचा प्रयोग मात्र फसला.

