जुन्या पुणे-नाशिक महामार्गाच्या कामामुळे व्यावसायिक हवालदिल खोदाई केल्याने ग्राहकांचा दुकानात जाण्यास कानाडोळा; काम लवकर करण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहरातून जाणार्या जुन्या पुणे-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. यासाठी रस्ता खोदल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत अनेक व्यावसायिकांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे.

जुना पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग राज्य सरकारकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा करुन निधी मंजूर करुन आणला आहे. या अंतर्गत चौपदरीकरणासह सुशोभीकरण होणार आहे. संगमनेर शहर हे सुसंस्कृत, बंधुभावाचे व भौतिक सुविधांबरोबर आंतरिक शांतता देणारे असल्याने येथे वास्तव्यास नागरिकांची मोठी पसंती आहे. सर्व सुविधांनी युक्त असलेल्या या वैभवशाली शहरात नव्याने जुन्या पुणे-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरण व सुशोभीकरण होणार आहे. तसेच घुलेवाडी सुकेवाडी मार्गे बाह्यवळण रस्ता व इतर बाह्यवळण रस्त्याने शहरातील वाहतूक वळवल्याने शहरातून वाहनांची वर्दळही कमी होण्यास मदत होणार आहे.

परंतु, सध्या सुरू असलेल्या कामासाठी रस्त्याची खोदाई करण्यात आली आहे. याचा फटका रस्त्याच्या कडेला असणार्या अनेक व्यावसायिकांना बसत आहे. ग्राहकांना वाहने उभी करण्यास जागा नसल्याने ते दुकानात जाण्यास धजावत नाही. याचा थेट फटका व्यवसायाला बसत आहे. आधीच कोरोना संकटाने हतबल असल्याने व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. या खोदाईमध्ये पालिकेच्या अनेक पाईपलाईनचे काम सुरू आहे. यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. त्यातच सध्या पालिकेवर प्रशासकराज असल्याने पदाधिकार्यांचे अधिकारही संपुष्टात आले आहे. त्यामुळे व्यावसायिकांना दाद मागणे अवघड होत आहे. तरी लवकरात लवकर हे काम पूर्ण करुन व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
