साईबाबांच्या द्वारकामाई मंदिराच्या दर्शन वेळेत बदल रात्रीची शेजारती होईपर्यंत मंदिर भाविकांसाठी खुले राहणार

नायक वृत्तसेवा, शिर्डी
साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत येणार्‍या भाविकांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्यावतीने साईबाबांच्या द्वारकामाई मंदिराच्या दर्शन वेळेत बदल करण्यात आला आहे. आता रात्रीची शेजारती होईपर्यंत द्वारकामाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे.

गुरुवारपासून (ता. 14) द्वारकामाई मंदिरासंदर्भातला हा नवीन बदल लागू होईल अशी माहिती साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे. यापूर्वी द्वारकामाई मंदिर पहाटे 5 ते रात्री 9:30 वाजेपर्यंतच भाविकांना दर्शनासाठी खुले असायचे. मात्र, आता दर्शन वेळेत बदल करण्यात आल्याने द्वारकामाई मंदिर हे पहाटे 5 ते साई समाधी मंदिरातील शेजारती होईपर्यंत म्हणजेच रात्री 10:30 वाजेपर्यंत खुले राहणार आहे. द्वारकामाई मंदिराची दर्शन वेळ एक तास वाढवण्यात आल्याने साईभक्तांनी आनंद व्यक्त करत साईबाबा संस्थानच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

1918 साली महानिर्वाणानंतर बुटीवाड्यात साईबाबांची समाधी बनवण्यात आली. आज त्याठिकाणाला समाधी मंदिर म्हणून ओळखले जाते. मात्र, साईबाबा शिर्डीत आल्यापासून ते महानिर्वाण होईपर्यंत त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य द्वारकामाई मंदिरात व्यथित केले. याठिकाणाहून साईबाबांनी अनेक भाविकांना शिकवण, उपदेश, गोरगरीबांची रुग्णसेवा व अन्न दिले. तसेच याठिकाणी साईबाबांनी अनेक भाविकांना आपल्या लिला देखील दाखविल्या. त्यामुळे द्वारकामाई मंदिराबाबत साईभक्तांच्या मनात विशेष आस्था आहे.


वर्षाकाठी देश-विदेशातून शिर्डीत साई समाधीच्या दर्शनासाठी येणारे करोडो साईभक्त, समाधीसह द्वारकामाई, चावडी व गुरुस्थान आदी ठिकाणी प्राधान्याने दर्शनाकरीता जातात. दररोज अनेक भाविक तासंतास द्वारकामाई मंदिरासमोर बसून साईभक्तीत तल्लीन झाल्याचे चित्र बघायला मिळते. तर शिर्डी ग्रामस्थही आपल्या दिवसाची सुरुवात द्वारकामाईच्या दर्शनाने करतात. द्वारकामाई मंदिराचे महत्व लक्षात घेता साई संस्थान व्यवस्थापन समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत शेजारती होईपर्यंत (रात्री 10:30) द्वारकामाई मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी खुले ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी केले आहे.

Visits: 9 Today: 1 Total: 118997

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *