सोनईमध्ये दरोडेखोरांनी एक लाखाचा ऐवज लांबविला
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील सोनई येथील दत्तनगर परिसरात दरोडेखोरांनी ‘कोरोना’ झाल्याची बतावणी करीत व हत्याराचा धाक दाखवून एक लाखाचा ऐवज लांबविला. घटनेनंतर काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल होऊनही दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. हा प्रकार सोमवारी (ता. 26) पहाटेच्या सुमारास घडला.
सोनईतील दत्तनगर भागातील मारुती मंदिरासमोर राहत असलेल्या संतोष कर्डिले यांच्या घराचा बाहेरील दरवाजा तोडून दरोडेखोर आत घुसले. त्यांच्या हातात कोयता, लोखंडी गज व कमरेला तलवारी होत्या. कर्डिले यांनी कोण आहे, अशी विचारणा केली असता त्यांनी कोरोना आहे लांबच थांबा, असे उत्तर दिले. नंतर चोरट्यांनी घरातील महिलांच्या गळ्यांतील तीन तोळ्यांचे दागिने लांबविले. कर्डिले यांच्या घराजवळच राहत असलेल्या दीपक जाधव यांच्या घराचा दरवाजा तोडून दरोडेखोरांनी कपाटातील तीन तोळे दागिने व तीन हजार रुपये चोरून नेले. चोरी करण्यापूर्वी शेजारील घरांच्या कड्या बाहेरून लावल्या होत्या. अण्णासाहेब दरंदले यांनी मध्यरात्री दोन वाजता चोरटे आल्याची खबर दिल्यानंतर पोलिसांचे वाहन दत्तनगर येथे आले. मात्र, पोलिसांचा सुगावा लागताच दरोडेखोरांनी बाजूच्या शेतातून धूम ठोकली.