टिटवी गावाला जोडणार्या रस्त्याची दयनीय अवस्था प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्वच रस्त्यांनी दयनीय अवस्था झालेली आहे. आदिवासी पट्ट्यातील रस्त्यांवरुन प्रवास करताना अक्षरशः जीव मुठीत धरुन जावे लागते. यातीलच दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्या टिटवी गावाला जोडणार्या रस्त्याची ‘खड्ड्यांत रस्ते की रस्त्यात खड्डे’ असे चित्र दिसत आहे. याबद्दल परिसरातील नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहे.

टिटवी गावाला जोडणार्या मुख्य रस्त्यापासून साधारण तीन किलोमीटर आत टिटवी गाव आहे. दळणवळणाच्या दृष्टीने टिटवीसह परिसरातील अनेक गावांना हा महत्त्वाचा रस्ता आहे. मात्र, 18 ते 20 वर्षांपूर्वी याचे काम झालेले आहे. तद्नंतर आजपावेतो याची ना दुरुस्ती ना नवीन काम झाले आहे. सद्यस्थितीत या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.

परंतु, जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणार्या या रस्त्याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी दुर्लक्षित ठेवला आहे, अशी भावना टिटवी ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. मुळात अरुंद असलेला हा रस्ता दुतर्फा झाडा-झुडूपांमुळे अडचणीचा असतो. रस्त्यावर येणारी झाडी व फांद्या कधीही बांधकाम खात्याने छाटल्या नाहीत. त्यामुळे चारचाकी दोन वाहने समोरासमोर आल्यावर अपघाताची शक्यता वाढते. त्यातून किरकोळ अपघातही होत असतात. अशा परिस्थितीत बस देखील गावात येत नाहीत. या दुरावस्थेमुळे नागरिकांचे प्रवासासाठी अतोनात हाल आहेत. म्हणून या गंभीर प्रश्नाची शासनासह लोकप्रतिनिधी यांनी दखल घेऊन तत्काळ रस्त्याचे काम करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आमच्या गावात रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बससेवा मिळत नाही. आम्ही त्यासाठी खूप प्रयत्न केले, आंदोलनही केले. त्यानंतर तात्पुरती बस सुरू झाली. मात्र, सद्यस्थितीत रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने अरुंद रस्त्याचे कारण देत बससेवा बंद करण्यात आली आहे.
– कविता भांगरे, सरपंच-टिटवी
