भरतीची तयारी करणार्‍या तरुणाचा अचानक मृत्यू! रणखांब येथील घटना; परिसरातून व्यक्त होतेय हळहळ

नायक वृत्तसेवा, घारगाव
पोलीस व सैन्य भरतीची तयारी करणार्‍या एका तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची घटना रणखांब (ता.संगमनेर) येथे घडली आहे. या दुर्दैवी घटनेने तरुणाच्या कुटुंबार दुःखाचा डोंगर कोसळला असल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पठारभागातील रणखांब येथील रोहित तात्याभाऊ शेजवळ (वय 21) हा तरुण पोलीस व सैन्य भरतीचे स्वप्न उराशी बाळगून नियमित तयारी करत होता. यासाठी तो दररोज सकाळी धावण्याचा सराव करत होता. नेहमीप्रमाणे तो रविवारी (ता.26) सकाळी पहाटे घराबाहेर पडला. धावत असताना त्याचा अचानक कोसळला. हा प्रकार तेथून जाणार्‍या नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ चुलतभाऊ सुधीर विलास शेजवळ यांना कळविले. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन रोहित यास उपचारार्थ संगमनेर ग्रामीण रुग्णालयात हलविले. परंतु, उपचारांपूर्वीच तो मयत असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषित केले.

या प्रकरणी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या खबरीवरुन घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यू क्रमांक 63/2021 सीआरपीसी 174 प्रमाणे नोंद केली आहे. अद्याप मृत्यूचे कारण समजले नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य हवालदार दशरथ वायाळ हे करत आहे. दरम्यान, रोहितसाठी रविवार अखेरचा दिवस ठरला आहे. त्यामुळे शेजवळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Visits: 150 Today: 1 Total: 1588907

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *