जिल्ह्यात पुन्हा ‘चोर’ सोडून ‘संन्यासी’च फासावर! राहुरी पलायन प्रकरणात झालेली कारवाई पुन्हा एकदा नागरी चर्चेचा विषय


नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरीच्या ब्रिटीशकालीन कारागृहातून ‘मकोका’चे आरोपी पसार होण्याच्या प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी अपेक्षेप्रमाणे कारवाई केली खरी. मात्र, यावेळीही चोर सोडून संन्याशालाच फासावर लटकविण्यात आल्याने राहुरीतील नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. या प्रकरणात कळीचा नारद ठरलेल्या ‘त्या’ चहावाल्याच्या जबाबावरुन राहुरीच्या पोलीस उपनिरीक्षकांसह पाच जणांना निलंबित करण्यात आले, मात्र या कारवाईपूर्वी त्या चहावाल्याने असा जबाब नेमका कोणाला वाचविण्यासाठी अथवा कोणाच्या सांगण्यावरुन दिला. याबाबत मात्र तपास न झाल्याने राहुरीत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.


राहुरीच्या कारागृहातून गेल्या 18 डिसेंबर रोजी कुख्यात सागर भांड टोळीतील तिघांसह पाच जण तुरुंगाचे गज कापून पसार झाले होते. या खळबळजनक घटनेनंतर स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र इंगळे यांची उचलबांगडी करुन राहुरीत एखाद्या खमक्या अधिकार्‍याची नियुक्ती करणे अपेक्षित होते. मात्र या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पोलीस ठाण्याजवळील एका चहावाल्यासह संगमनेर तालुक्यातील एकाला अटक केली होती. त्यातील चहावाल्याच्या चौकशीतून सागर भांड टोळीला तुरुंगातून पळून जाण्यास राहुरीचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्यासह पाच कर्मचारी मदत केल्याचे समोर आले. त्याच्या जबाबाची सत्यता नेमकी कोणत्या पडताळली गेली ही गोष्ट गुलदस्त्यात असली तरी केवळ एका चहावाल्याच्या सांगण्यावरुन पोलीस अधीक्षकांनी या संपूर्ण प्रकरणाचा ठपका ठेवून उपनिरीक्षक धाकराव याच्यासह हवालदार संजय राठोड, पोलीस नाईक संजयकुमार जाधव, रोहिदास गुंडाखे, पोलीस शिपाई बाळू चाबुकस्वार व महिला पोलीस शिपाई मनीषा गुंड यांना तडकाफडकी निलंबित केले.

या कारवाईनंतर राहुरी शहरात उलटसुलट चर्चांना अक्षरशः ऊत आला असून, झालेली कारवाई अयोग्य आणि चुकीची असल्याचा सूर आता नागरिकांमधून निघू लागला आहे. ‘त्या’ चहावाल्याने भांड याच्या पत्नीशी संगनमत करुन कारागृहात कैद असलेल्या आरोपींना गज कापण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य पुरवले. त्याच्यावर भरवसा ठेवून ही कारवाई करण्यात आली. मात्र त्याचवेळी तो खरोखरी वस्तुस्थिती सांगतोय की कोणाला फसविण्यासाठी कोणाच्या तरी आदेशाने पोलीस तपास भरकटवतोय याचा मात्र तपास झाला नाही. यामुळे कारवाई करण्यात आलेल्या अधिकार्‍यासह कर्मचार्‍यांवर एकप्रकारे अन्याय झाल्याची भावना राहुरीकरांच्या मनात निर्माण झाली आहे.

तुषार धाकराव यांची राहुरीतील कारकीर्द कधीही वादग्रस्त ठरलेली नाही. आपल्या नावाप्रमाणेच त्यांनी राहुरीतील गुन्हेगारी प्रवृत्तींवर ‘धाक’ निर्माण करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. अशी चर्चा राहुरीत सध्या सुरू आहे. प्रामाणिकपणे काम करुनही जर वरिष्ठांकडून अशाप्रकारे अन्यायात्मक कारवाई होत असेल तर गुन्हेगारांशी दोन हात करण्यास कोणीही धजावणार नाही. असेही राहुरीत बोलले जात आहे. मागील काही महिन्यांत एखाद्या प्रकरणात थेट दोषी असतानाही प्रभारी अधिकार्‍यांवरील कारवाई टाळली जात आहे. तोच प्रघात कायम ठेवण्यासाठी राहुरीतील प्रकरणात कनिष्ठ अधिकारी व कर्मचार्‍यांचा बळी तर दिला गेला नाही ना? असा सवालही नागरिकांतून उपस्थित होत आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणातील राहिलेल्या कड्या जोडून दोषी असलेल्यांवरच कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

Visits: 200 Today: 2 Total: 1421701

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *