न्याय हक्कासाठी विडी कामगारांचे घंटानाद आंदोलन! विडी उत्पादनाचा परवाना नसतांनाही बनावट नावाने उत्पादन सुरु असल्याचा आरोप
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सहकार कायद्यानुसार नोंदणीकृत असलेल्या उद्योगाकडे विडी-सिगारेट कायद्यातंर्गत नोंदणी अथवा परवाना नसतानाही त्यांच्याकडून विडीचे उत्पादन सुरु आहे. सदरची बाब लक्षात आल्यानंतर कामगार आयुक्तांकडून संबंधितांना नोटीसही बजावण्यात आली, मात्र त्या उपरांतही हा उद्योग सुरुच आहे. या उद्योगात होणारे उत्पादन श्रमिक या नावाने असणे आवश्यक असताना भलत्याच नावाचा वापर करुन सदरचे उत्पादन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येते. यातून शासनाच्या डोळ्यात धूळफेक केली जात असून संस्थेतील लेबल व विडी कामगारांना आपल्या सवलतींपासून वंचित ठेवले जात आहे. सदरील संस्थेने कामगारांच्या हक्काचे पैसे त्यांना द्यावेत या मागणीसाठी महाराष्ट्र कामागर कल्याण संघटनेने आज उपविभागीय अधिकार्यांच्या कार्यालयाबाहेर घंटानाद आंदोलन केले.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात संघटनेने म्हंटले आहे की, तालुक्यातील चिंचोली गुरव येथील श्रमिक विडी औद्योगिक सहकारी संस्थेच्या कामगारांना विडी-सिगारेट कायद्यातंर्गत व कामगार कायद्यातील तरतुदींनुसार बोनस, ग्रॅच्युएटी व अन्य सवलती मिळाव्यात यासाठी आजचे आंदोलन पुकारण्यात आले आहे. सदरील संस्था सन 2008 सालापासून सहकार संस्थेच्या नोंदणीतंर्गत विडी उत्पादन करीत आहे. या संस्थेकडे कायदेशीर विडी, सिगार काय्दयानुसार कोणतेही नोंदणी प्रमाणपत्र नाही, तरीही या संस्थेत विडीचे उत्पादन केले जात असल्याचे कामगार आयुक्त कार्यालयाच्याही निदर्शनास आलेले आहे.
याबाबत संबंधितांना प्रमाणपत्र सादर करण्याबाबत नोटीसही बजावण्यात आलेली आहे. सदरील संस्था बेकायदा पद्धतीने विडीचे उत्पादन करीत असल्याचेही या निवेदनातून सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या संस्थेचे उत्पादन श्रमिक संस्थेच्या नावाने होणे अपेक्षित असताना भलत्याच नावाच्या लेबलनुसार येथे होणारे उत्पादन बाजारात विकले जात आहे. उत्पादन करणारी संस्था आणि प्रत्यक्ष उत्पादनावरील नाव वेगवेगळे असल्याने कामगार आयुक्तांसह शासनाच्या डोळ्यात धुळ झोकली जात आहे. त्यामुळे संस्थेत काम करणारे लेबल व विडी कामगार आपल्या हक्काच्या बोनस, ग्रॅच्युएटी, किमान वेतन व पगारी रजेच्या हक्कापासून वंचित राहिले आहेत.
संस्थेचे सभासद/मालक अशा नावाने विडी कामगारांचे हक्क डावलले जात असल्याने त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र कामगार कल्याण संघटनेच्या माध्यमातून गेल्या तीन-चार महिन्यांपासून श्रमिक विडी उद्योग संस्थेच्या विरोधात लढा सुरु असून कामगारांना न्याय मिळेपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचे निवेदनातून सांगण्यात आले आहे. या निवेदनावर सचिन साळुंखे, असीफ शेख, दत्ता चव्हाण, संतोष जेधे, फरजाना शेख, रेश्मा मोमीन, अरुणा साळुंखे, रतन सिनारे, नंदा सयके व जयश्री साळुंके यांची नावे व सह्या आहेत.