साईनगरीत मिळतात श्रींचे दर्शन घेतानाचे एडिटेड फोटो! नगरपंचायतकडून गंभीर दखल; फोटो स्टुडिओ सील करण्याचा इशारा
नायक वृत्तसेवा, शिर्डी
आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवस्थान असलेल्या शिर्डीच्या साई समाधी मंदिरात छायाचित्रणाला बंदी आहे. त्यामुळे सामान्य भाविकांना समाधीजवळ दर्शन घेताना अगर मंदिर परिसरात छायाचित्रे घेता येत नाहीत. यातून पैसे कमावण्याची युक्ती शिर्डीतील काही व्यावसायिक छायाचित्रकरांनी शोधली आहे. फोटो एडिटिंगच्या मदतीने भाविकांना समाधीजवळ, मंदिर परिसरात जसे हवे तसे फोटो तयार करून दिले जात आहेत. यातून त्यांना मोठी कमाई होत आहे. मात्र, शिर्डीच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने ही गोष्ट चुकीची असल्याचे सांगत शिर्डी नगरपंचायतीने आता या विरोधात कारवाई सुरू केली आहे. अशा प्रकारांवर बंदी घालण्यात आली असून ज्या फोटो स्टुडिओत असे प्रकार आढळून येतील, ते सील केले जातील, असा इशारा देण्यात आला आहे.
अनेक पर्यटन स्थळांवर विविध प्रकारची छायाचित्रे तत्काळ काढून देण्याचा व्यवसाय चालतो. मात्र, ती पर्यटन स्थळे असतात. शिर्डी तीर्थक्षेत्र आणि श्रद्धास्थान आहे. त्यामुळे येथे असे प्रकार करणे भावना आणि प्रतिष्ठेशीही तडजोड करणारे असल्याने त्याला शिर्डीतूनच विरोध होत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मंदिरात मोबाईल कॅमेरा नेण्यास मनाई केलेली आहे. त्यामुळे मंदिरात व परिसरात कोणतीही फोटोग्राफी करता येत नाही. दूरवरून आलेल्या अनेक भाविकांना दर्शन आणि मंदिर भेटीची छायाचित्रे असावी असे वाटते. अशा भाविकांना हेरून काही फोटग्राफरने हा धंदा सुरू केला आहे. भाविकांचे बाहेर फोटो घेऊन ते आधीच्या मंदिर परिसरातील आणि समाधीजवळील फोटोत एडिटींग करून जोडले जातात. जणू भाविकांनीच मंदिरात आणि समाधीजवळ फोटो काढले आहेत, असे ते तयार करून दिले जातात. या बदल्यात मोठी रक्कम स्वीकारली जाते. कमी श्रमात कमी वेळेत व मोठ्या प्रमाणात पैसे मिळवून देणारा हा धंदा शिर्डीत वेगाने सुरू झाला आहे. प्रत्यक्ष फोटो तयार करणार्यांसोबत यासाठी इच्छुक भाविकांना स्टुडिओपर्यंत घेऊन येणारेही तयार झाले आहेत. अनेक भाविकही शिर्डीतील फोटो संग्रही असावेत, असे वाटून पडेल ती किंमत मोजून असे फोटो तयार करून घेतात. मात्र, या एडिटिंग केलेल्या फोटोमुळे कॉपीराइटचा भंग होतो. तो गुन्हा आहेच पण शिर्डीच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीनेही चुकीचे आहे.
पूर्वी पोलिसांकडून कारवाई झाल्याने हा व्यवसाय थांबला होता. आता करोनानंतर भाविकांची गर्दी वाढल्याने तो पुन्हा सुरू झाला आहे. शिर्डी नगरपंचायतीने आता यावर कडक निर्बंध लादले आहेत. अशा प्रकारांचा शोध घेऊन कारवाईसाठी कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, त्यांनाही दमबाजी केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शिर्डी नगरपंचायत, साईबाबा संस्थान, पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिर्डीतील बायजा माँ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव कोते यांनी केली आहे.