पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात डिसेंबरअखेर 41 ‘बळी’! 1 कोटी 69 लाख 96 हजार 599 रुपयांचा दंडही केला वसूल..

नायक वृत्तसेवा, घारगाव
अत्यंत रहदारी असणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर जानेवारी ते डिसेंबर (2021) अखेर रस्ते अपघातात तब्बल 41 लोकांनी आपला जीव गमावला असल्याचे समोर आले आहे. आळेखिंड ते कर्‍हे घाट अशा 68 किलोमीटर हद्दीत हे अपघात झाले आहेत. याचबरोबर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वर्षभरात 27 हजार 432 वाहनधारकांवर कारवाई करुन 1 कोटी 69 लाख 96 हजार 599 रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रमुख उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी दिली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पुणे व नाशिक या दोन महानगरांना जोडणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर दररोज मालवाहतूकसह प्रवासी वाहनांची वर्दळ असते. आळेखिंड ते कर्‍हे घाट अशी 68 किलोमीटर हद्दीची जबाबदारी डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्र निभावत आहे. महामार्गावर वाहतूक नियमांचे पालन व्हावे आणि अपघातांचे प्रमाण कमी रहावे यासाठी हे केंद्र सातत्याने प्रबोधनासह उपक्रमही राबवत आहेत. तरी देखील विविध कारणांमुळे अपघात होत आहे. यामध्ये जानेवारी ते डिसेंबर अखेरपर्यंत दुचाकी अपघातांत 28 जण ठार झाले तर पायी जाणार्‍या 10 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर चारचाकी वाहनांच्या अपघातात तिघे ठार झाले असल्याचे डोळासणे महामार्ग केंद्राचे प्रमुख भालचंद्र शिंदे यांनी दिली.

यामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वर्षअखेर 27 हजार 432 वाहनांवर कारवाई करुन 1 कोटी 69 लाख 96 हजार 599 रुपयांचा दंड वसूल केला आहे. यात अतिवेगाने वाहन चालवणे 13 हजार 401 कारवाई, विनाहेल्मेट 855 कारवाई तर धोकादायकरित्या वाहन चालवणे यावरही कारवाई केल्या आहेत. यामधून गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अपघातांची संख्या कमी असली तरी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवल्यामुळे अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रवास करताना वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन केले तर नक्कीच अपघात रोखण्यास मदत होईल, असा विश्वास उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

याचबरोबर अपघाताची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी दाखल होवून अपघातग्रस्तांना मदत करणे आणि वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी डोळासणे महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार नारायण ढोकरे, सुनील साळवे, मनीष शिंदे, उमेश गव्हाणे, अरविंद गिरी, कैलास ठोंबरे, पंढरीनाथ पुजारी, भारत गांजवे, संजय मंडलिक, नंदकुमार बर्डे, योगीराज सोनवणे यांच्यासह स्थानिक नागरिक मदत करत आहेत. यामुळे अनेकांचे जीव वाचविण्यास मदत झाली आहे.

रस्ते अपघात रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असतानाही अतिवेगाने वाहन चालविणे, सीटबेल्ट न लावणे, मोबाईलवर बोलून वाहन चालविणे, मद्य प्राशन करुन वाहन चालविणे, विनाहेल्मेट वाहन चालविणे, मर्यादा ओलांडलेली वाहने वापरणे, वाहनांची वेळेत देखभाल न करणे, रस्त्यांची दुर्दशा आदी कारणे अपघातास कारणीभूत ठरले असल्याचे दिसून येत आहे.

Visits: 114 Today: 1 Total: 1416468

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *