रेशन घोटाळ्यात सहभाग आढळल्यास आमदारकीचा राजीनामा ः आ. डॉ. लहामटे अकोले नगरपंचायत निवडणूक रणसंग्राम; प्रचारसभेत विरोधकांवर टीकास्त्र

नायक वृत्तसेवा, अकोले
रेशन घोटाळ्यात माझा सहभाग आढळला तर माझा आमदारकीचा राजीनामा देईल. तसेच केसावर फुगे विकण्याचे काम आमदार डॉक्टर किरण लहामटे कधीच करणार नाही असे प्रत्युत्तर आमदार लहामटे यांनी विरोधकांना दिले.

गुरुवारी (ता.16) संध्याकाळी अकोले शहरातील गुजरी बाजार येथे नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आघाडीच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच संपत गायकवाड होते. तर कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, शिवसेना तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, अशोक देशमुखख महेश नवले, प्रकाश मालुंजकर, प्रताप देशमुख, रामहरी तिकांडे, स्वाती शेणकर, नीता आवारी, राजेंद्र कुमकर, डॉ. अविनाश कानवडे, भाऊसाहेब गोर्डे, प्रदीप हासे, विकास शेटे, सुरेश खांडगे, उज्ज्वला राऊत, सुभाष मालुंजकर, सीमा मालुंजकर, मुकुंद लहामटे, विकास बंगाळ यांच्यासह तेरा प्रभागातील राष्ट्रवादी व शिवसेना आघाडीच्या तेरा उमेदवार उपस्थित होते.

यावेळी आमदार डॉक्टर लहामटे म्हणाले, ज्यांनी यापूर्वी एकमेकांची उणीदुणी काढली ते आता पिचडांच्या तंबूत जाऊन एकमेकांच्या गळ्यात गळे घालताहेत. तीन ते चार वर्षांपूर्वी व्हायरल झालेल्या क्लिपचा संदर्भ देऊन आपल्यावर झालेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. कोरोना काळात माझ्या कार्यकर्त्यांनी कोतूळ, ब्राह्मणवाडा येथे गायकर यांनी अगस्ति आश्रम येथे तर तालुक्यातील शिक्षकांनी सुगाव खुर्द येथे कोविड सेंटर उभारले. यावेळी मात्र विरोधकांनी घरात राहणेच पसंत केले. त्यांनी वैकुंठरथ देऊन जनतेला स्मशानभूमीत पोहोचविण्याचे काम केल्याची खरमरीत टीका केली.

तसेच कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर म्हणाले, पंचवीस वर्षांपूर्वी मी जिल्हा परिषद निवडणुकीला उभा असताना अकोले शहराने भरभरून मते दिल्याने अटीतटीच्या निवडणुकीत माझा विजय झाला. या निवडणुकीत कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला निवडून द्या ते शहरासाठी महाविकास आघाडी सरकारकडून भरभरून निधी आणतील. याप्रसंगी संतप नाईकवाडी, मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, राजेंद्र कुमकर, विकास शेटे, संजय वाकचौरे, स्वाती शेणकर, माधव तिटमे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन र मुकुंद भोर यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे यांनी मानले.

Visits: 125 Today: 1 Total: 1102112

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *