संगमनेरातील नामांकित ‘मूकबधीर’ विद्यालयात चिमुरडीचा विनयभंग? शाळा प्रशासनाकडून इन्कार; प्रकरणाला राजकीय रंग चढल्याने मुख्याध्यापकासह दोघांवर गुन्हा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील एका नामांकित मूकबधीर विद्यालयात शिकणार्या सातवर्षीय मूकबधीर विद्यार्थीनीचा विनयभंग करुन तिच्या नाजूक ठिकाणी चटके देण्यात आल्याची तक्रार पीडित चिमुरडीच्या मामांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका अज्ञात इसमासह असा काही प्रकार घडलाच नसल्याचे सांगत प्रकरण मिटवून घेण्याचा आग्रह करणार्या ‘त्या’ शाळेच्या मुख्याध्यापकांवर (प्रभारी) विनयभंगासह पोक्सोतील विविध तरतुदींन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदरच्या जखमा त्वचेला झालेल्या संसर्गातूनही होण्याची शक्यता आहे, मात्र लोणीच्या ग्रामीण रुग्णालयाने या जखमांबाबत संशय व्यक्त केल्याने पीडितेच्या नातेवाईकांनी केलेल्या आग्रहावरुन शहर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणाला आता राजकीय रंग चढवण्याची कवायतही सुरु झाल्याने त्यातून विविध आरोपही केले जावू लागले आहेत.

याबाबत मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार सदरचा प्रकार गेल्या शनिवारी (1 ऑक्टोबर) समोर आला. मूळच्या राहाता तालुक्यातील ग्रामीण भागात राहणार्या एका गरीब दाम्पत्याला दोन मुली आहेत. त्यातील मोठी मुलगी जन्मतः मूकबधीर असल्याने सन 2020 मध्ये ती पाच वर्षांची असताना तिला संगमनेर तालुक्यातील एका मूकबधीर विद्यालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर कोविड संक्रमणाच्या कालखंडात शाळा बंद ठेवण्यात आल्याने निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांनाही घरी पाठविण्यात आले होते. त्यानुसार सदर चिमुरडीलाही तिच्या आई-वडीलांनी घरी नेले होते.

चालूवर्षी नियमितपणे शाळा सुरु झाल्यानंतर संबंधित दाम्पत्याने पुन्हा संगमनेरात येवून आपल्या मुलीला ‘त्या’ शाळेत दाखल केले व त्यानंतर ते दोघेही पुन्हा माघारी परतले. या दरम्यान सदरील मुलगी ‘त्या’ विद्यालयात शिक्षण घेवून अन्य मुलींसोबत शाळेतील वसतिगृहातच राहत होती. सगळं काही सुरळीतपणे सुरु असताना गेल्या शनिवारी (1 ऑक्टोबर) सदरील शाळेतील एका महिला शिक्षिकेने संबंधित मुलीच्या आईला फोन केला व ‘तुमच्या मुलीला जखमा झाल्या असून ती सारखी रडत आहे. तुम्ही शाळेत येवून तिला घेवून जा!’ असा निरोप त्यांना दिला. त्यामुळे घाबरलेल्या सदरील महिलेने तत्काळ आपल्या भावाला फोन करुन सदर प्रकार सांगितला आणि तिने आपल्या पतीसह संगमनेरला धाव घेतली.

संबंधित मुलीचे आई-वडील शाळेत आले असता तेथील महिला शिक्षिकेला भेटले. यावेळी त्या शिक्षिकेने ‘तुमच्या मुलीच्या नाजूक भागाच्या आसपास जखमा झालेल्या असून आम्ही तीन दिवसांपासून त्यावर उपचार करीत आहोत. मात्र त्यात कोणताही फरक पडत नसल्याने तुम्हाला बोलावले आहे. तुम्ही तिला घेवून जा व चांगल्या दवाखान्यात तिच्यावर उपचार करा’ असा सल्ला त्यांना दिला. त्यानुसार ‘त्या’ दाम्पत्याने आपल्या मुलीला सोबत घेवून आपले मूळगाव गाठले व त्याच दिवशी तिला नजीकच्या गावातील एका खासगी डॉक्टरांकडे दाखवून गोळ्या-औषधे घेतली. मात्र त्यातूनही कोणताच फरक न पडल्याने त्यांनी सोमवारी (ता.3) तिला लोणीच्या ग्रामीण रुग्णालयात नेले.

त्याठिकाणी मुलीच्या तपासणीनंतर तिच्या नातेवाईकांनी तपासणी अहवालाबाबत डॉक्टरांकडे चौकशी केली असता त्यांनी ‘सदर प्रकरणाचा अहवाल तुमच्याकडे देता येणार नाही, तुम्ही पोलीस ठाण्यात जावून तक्रार दाखल करा, त्यांच्या मागणीवरुन तपासणीचा अहवाल त्यांनाच दिला जाईल’ असे सांगितल्याने त्या चिमुरडीचे नातेवाईक हादरले. त्यांना नेमकं काय झालंय हेच समजत नसल्याने मुलीच्या आई-वडीलांसह तिच्या मामाने तेथून थेट संगमनेरात येवून ‘ती’ शाळा गाठली व शाळेच्या मुख्याध्यापकांची भेट घेत ‘आमच्या मुलीला कोणत्या कारणाने जखमा झाल्या आहेत अशी विचारणा केली.’

त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी स्वच्छतेच्या अभावामुळे त्वचेला संसर्ग होवून असे प्रकार घडतात, मूकबधीर विद्यार्थ्यांना अनेकवेळा अशाकाही गोष्टी लक्षात येत नसल्याने त्यातून हा संसर्ग वाढला असण्याची शक्यता असल्याचे सांगितले. या प्रकरणात काहीएक चुकीचं घडलेलं नाही, तुम्ही नाहक प्रकरणं न वाढवता चर्चेतून मार्ग काढून ते मिटवून घेण्याची विनंती त्यांना केली. मात्र ‘लोणी’च्या ग्रामीण रुग्णालयाने व्यक्त केलेला संशय आणि तपासणी अहवाल पोलिसांकडेच देण्याच्या भूमिकेमुळे त्या सर्वांच्या मनात शंकांचे काहूर निर्माण झाल्याने त्यांनी मुख्याध्यापकांवर अविश्वास दाखवित थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले.

संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने व पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांची भेट घेवून त्यांनी वरीलप्रमाणे संपूर्ण प्रकार कथन केला. त्यानुसार पोलिसांनीही कोणतीही दिरंगाई न करता संबंधित मुलीला घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले.
मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी संसाधनांची अनुपलब्धता सांगून सदरील पीडितेला अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मंगळवारी (ता.4) रात्री तिला नगरला नेण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार सुरु असून लोणीच्या ग्रामीण रुग्णालयाने दिलेल्या प्राथमिक तपासणी अहवालाच्या आधारावर संगमनेर पोलिसांनी पीडितेच्या मामाची फिर्याद दाखल करुन घेतली आहे. त्यानुसार एका अज्ञात इसमासह ‘त्या’ शाळेच्या मुख्याध्यापकांवर (प्रभारी) भारतीय दंडसंहितेचे कलम 354, 324 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याचे (पोक्सो) कलम 8, 10, 21 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले यांच्याकडे देण्यात आला आहे.

या प्रकरणात लोणी, घुलेवाडी व अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात सदर पीडित चिमुरडीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. मात्र यातील लोणी ग्रामीण रुग्णालयाच्या अहवालाशिवाय अन्य रुग्णालयांकडून चुकीचे काही घडल्याबाबत अहवाल प्राप्त नसल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसत असून जिल्हा रुग्णालयाने याबाबत नाशिकच्या न्याय्यवैद्यक प्रयोगशाळेचा अभिप्राय मागवल्याची माहिती मिळाली आहे, या अहवालानंतरच नेमकी वस्तुस्थिती समोर येईल. मात्र असे प्रकार नाजूक भागातील स्वच्छतेच्या अभावातून संसर्ग झाल्याने उद्भवू शकतात असा निष्कर्षही समोर येत असल्याने संबंधित मुलीचा विनयभंग झाला आहे की तिच्यासोबत काही चुकीचे घडले आहे याबाबत मत व्यक्त करणं याक्षणी घाईचे ठरणार आहे.

