कोरोना प्रादुर्भावामुळे महाशिवरात्रीचे कार्यक्रम रद्द
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्यानुसार गुरुवारी (ता.11) असणारी महाशिवरात्री पर्वानिमित्तचे सर्व कार्यक्रम जवळे बाळेश्वर (बाळेश्वर), खांडगाव (खांडेश्वर), कोकणगाव (निझर्णेश्वर), धांदरफळ (रामेश्वर), खंदरमाळ (खंद्रेश्वर), आंबीदुमाला (संगमेश्वर) या देवस्थानांना रद्द करण्याच्या सूचना तालुका प्रशासनाने दिल्या आहेत. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करु नये असे आवाहन देवस्थानांनी केले आहे.
कोरोना महामारीची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यातच दिवसेंदिवस शहरासह खेड्यांतही बाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागांना निर्गमित केल्या आहेत. त्यात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्यानुसार गुरुवारी येणार्या महाशिवरात्री पर्वानिमित्तचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना प्रशासनाने तालुक्यातील महादेवाचे स्थान असणार्या देवस्थानांना दिल्या आहेत. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले आहे.