93 वर्षांच्या तरण्याबांड आजोबांची कोविडवर मात! संगमनेरातील सुयश मल्टीस्पेशालिटी रुग्णालयातून आज पोहोचले घरी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविडच्या दुसर्‍या संक्रमणाने अवघ्या जिल्ह्यात हाहाकार उडालेला असतांना त्यातूनही दिलासा देणारे वृत्त समोर आले आहे. एकीकडे कोविडच्या दुसर्‍या लाटेत जायबंदी होवून मृत्यू पावणार्‍यांमध्ये 45 ते 60 वर्षांदरम्यानच्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे समोर आले असतांना प्रबळ इच्छाशक्ति आणि डॉक्टरांचे योग्य उपचार यामुळे काय घडू शकते याचे उत्तम उदाहरण संगमनेरातून समोर आले आहे. शहरातील एका खासगी रुग्णालयातील उपचारांना प्रतिसाद देत चक्क 93 वर्षांच्या ‘तरण्याबांड’ वयोवृद्धाने कोविडशी चारहात करुन त्याचा पराभव केला आहे. आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या व्यक्ति कोविडसमोर शरणांगती पत्करत असतांना या ज्येष्ठाने आपण जिंकणारच असा ठाम विश्‍वास बाळगून उपचारांना दिलेली साथ आज त्यांना सुखरुप घरी घेवून गेली. संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, इंन्सीडेंट कमांडर अमोल निकम व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कचेरिया यांनी 93 वर्षांच्या या तरुणाचे विशेष कौतुक केले आहे.


सध्या तालुक्यातील कोविड स्थिती अत्यंत चिंताजनक अवस्थेत पोहोचली आहे. दररोज वाढणारी रुग्णसंख्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करीत आहे. त्यातच मृतांमध्ये आता 45 वर्षांवरील व्यक्तिंचा अधिक भरणा असल्याने दुसरे संक्रमण अधिक जीवघेणे असल्याचा अंदाज र्वतविला जातोय. गेल्या वर्षभरापासून देशात सुरु असलेल्या संक्रमणाने नागरिकांच्या मनात एकीकडे भितीचे वातावरण तयार केलेल असतांना दुसरीकडे पोटापाण्यासाठी कामधंदा करणं आवश्यक झाले आहे. अशा स्थितीत संक्रमणाची गती वाढली असून बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांना कोविडची लागण होत असल्याचे दिसून येत आहे.


संगमनेर तालुक्यात गेल्या महिन्याभरात सुमारे सतराशे रुग्ण समोर आहेत. आजवरच्या तालुक्यातील कोविड इतिहासात एकाच महिन्यात झालेली ही सर्वाधीक रुग्णवाढ आहे. त्यातील एका 93 वर्षीय आजोबांना कोविडची लागण झाली होती. उपचारांसाठी त्यांनी शहरातील सुयश मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज रंगपंचमीच्या दिनी या 93 वर्षांच्या तरण्याबांड वयोवृद्धाला उपचार पूर्ण करुन ठणठणीत झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ.विशाल मुटकूळे, डॉ.किशोर पवार, डॉ.दीपक जंबुकर आणि रुग्णालयातील अन्य सहकार्‍यांनी आजोबांना फुलांचा गुच्छ देवून त्यांच्या ‘इच्छाशक्ति’ची वाहवा केली.


कोविड या नावाची मनामनात दहशत आहे, त्याची लागण झाली आहे असे समोर आले की रुग्ण अर्धमेला होतो. त्यामुळे उपचारांना त्याची साथ मिळणं अवघड होतं. मात्र 93 वर्षांच्या या आजोबांनी ‘झाला तर झाला, आता त्याला हरवून बरंही होवू’ असा आत्मविश्‍वास मनात बाळगूनच रुग्णालयात पाय ठेवला होता, त्याचा परिणाम आज दिसून आला. आजोबांनी आपल्या प्रबळ इच्छाशक्तिच्या बळावर कोविडचा पराभव करुन समाजातील अन्य रुग्णांसमोर एक आदर्शच उभा केला आहे. एकतर काळजी घ्या, मास्क आणि सामाजिक अंतर या नियमांचे पदोपदी पालन करा. या उपरांतही लागण झालीच तर मनात कोणताही किंतू न ठेवता उपचार घ्या, मनात कोविडचा आपण पराभव करणारच आहोत असा ठाम विश्‍वास बाळगा असा मोलाचा सल्ला या आजोबांनी दिला आहे.

Visits: 147 Today: 1 Total: 1595817

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *