गावपातळीवरील निवडणूका एकत्र लढणे अवघड : थोरात भाजपात गेलेल्यांची लवकरच घरवापसी होणार असल्याचेही दिले संकेत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
ग्रामपंचायतीचे राजकारण गावपातळीवर असल्याने या निवडणूका एकत्रितपणे लढणं अवघड आहे. प्रत्येकालाच आपला पक्ष वाढवण्याची इच्छा आणि जबाबदारी असते. त्यानुसार राज्यातील अधिकाधिक ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व रहावे यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. विधान परिषदेच्या निवडणूकांमध्ये मिळालेल्या यशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलेलं असून त्याचा सकारात्मक परिणाम ग्रामंपचायत निवडणूकांच्या माध्यमातून पहायला मिळेल असे प्रतिपादन राज्याचे महसुलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे केले.

यावेळी पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी स्थापन करताना सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवण्यात आला होता. गरीब आणि मागासवर्गीयांचा जीवनस्तर उंचावा यावरच आम्ही लक्ष्य केंद्रीत केले होते. या विषयावर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी सतत मुख्यमंत्र्यांशी संवाद साधीत असतात. अशा प्रकारच्या संवादात कधीकधी पत्ररुपी चर्चाही करावी लागते, तो देखील संवादाचाच भाग असल्याने त्यात वेगळे असे काही नाही असेही ते यावेळी म्हणाले. सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीण्याच्या विषयावर अधिक प्रकाश टाकतांना ते म्हणाले की, महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमाच्या सूत्रावर निर्माण झाली आहे. ते सूत्र अधिक सक्षमपणे कसे राबवता येईल यावरच पक्षाध्यक्षा गांधी यांनी त्या पत्रातून चर्चा केली असून नाराजी वगैरे असल्याच्या वृत्ताचा त्यांनी स्पष्ट शब्दात इंकार केला. सामान्य माणसांचं जीवनमान उंचावणे हा कॉग्रेसचा विचार असून त्यावरच आम्ही काम करीत असतो असेही ते म्हणाले.

काँग्रेस अंतर्गत पदाधिकारी निवडीबाबत बोलतांना त्यांनी निवडणूकीची प्रक्रीय सुरु असल्याचे सांगीतले. देशावर कोविडचे संकट कोसळल्याने गेल्या आठ-दहा महिन्यांपासून ही प्रक्रीया खोळंबली होती. मात्र आता हे संकट मागे सरल्याने येत्या दोन महिन्यात राज्यातील सर्व पदाधिकार्यांच्या निवडी पूर्ण होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तर देतांना मेट्रो कारशेडच्या मुद्दयावरही त्यांनी भाष्य केले. सदरचा प्रकल्प राजकारणाचा भाग नसून मुंबईचे पर्यावरण जपण्याचा प्रयत्न आहे. विशेषतः आरे विभागात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. मुख्यमंत्री नेहमीच पर्यावरण व वन संरक्षण या विषयावर जागृत असतात. त्याच भावनेतून त्यांनी कारशेडचा निर्णय घेतल्याचे सांगताना यावर विेराधकांकडून सुरु असणारे राजकारण दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या लक्षात आलंय की भाजप संपत चाललाय, गेल्या काही निवडणूकांमधून हेच दिसून आलंय. त्या नैराश्यातूनच ते वेगवेगळी वक्तव्य करीत असतात असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. विरोधकांकडून महाविकास आघाडीत बिघाड करण्याचा प्रयत्न सुरु आहे, मात्र त्यात ते कधीही यशस्वी होणार नाहीत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विरोधकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करुन महाविकास आघाडी आपलं काम करीतच राहील असे सांगतांना त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी सोडून अनेक जण भाजपात गेले होते. मात्र आता त्या सर्वांची पुन्हा स्वपक्षात येण्याची इच्छा असून अनेकांशी आमची चर्चाही सुरु असून लवकरच अनेकांची घरवापसी होण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.

