राजूर पोलिसांनी अवैधरित्या दारु वाहतूक करणारे वाहन पकडले एकावर गुन्हा दाखल तर 1 लाख 30 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त
नायक वृत्तसेवा, राजूर
कोल्हार-घोटी रस्त्याने अवैध दारु वाहतूक करणारे वाहन जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन राजूर पोलिसांनी नाकाबंदी करुन त्यास पकडले. सदर कारवाई गुरुवारी (ता.29) रात्री 9 वाजेच्या सुमारास केली असून, 1 लाख 30 हजार 240 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अकोले तालुक्यातून जाणार्या कोल्हार-घोटी रस्त्याने अवैध दारु वाहतूक करणारे वाहन जाणार असल्याची खात्रीशीर माहिती खबर्याकडून राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना मिळाली. त्यानुसार गुरुवारी रात्री पोलिसांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ नाकाबंदी केली. त्यावेळी मनोज भीवा गवारी (वय 25, रा. सर्वोदय, राजूर) हा मारुती सुझुकी कंपनीच्या 800 कार (क्र. एमएच.03, झेड.620) कारमधून दारु घेऊन येत असताना पकडला. कारची अधिक तपासणी केली असता तिच्यामध्ये 30 हजार 240 रुपयांच्या बॉबी संत्रा कंपनीच्या 504 सीलबंद देशी दारुच्या बाटल्या मिळून आल्या.
या प्रकरणी कारचालक मनोज गवारी याच्याविरोधात राजूर पोलिसांनी विना परवाना विक्रीसाठी अवैधरित्या चालविलेल्या दारु वाहतूक प्रकरणी गुरनं. 123/2021 मुं.पो.अॅक्ट कलम 65 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तर 1 लाख रुपयांची कार व 30 हजार 240 रुपयांची दारु असा एकूण 1 लाख 30 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य हवालदार भैलुमे, अशोक गाडे, फटांगरे, पांडुरंग पटेकर यांनी केली. पुढील तपास मुख्य हवालदार भैलुमे हे करत आहे. या धडाकेबाज कारवाईचे नागरिकांतून स्वागत होत असून, कोरोना संकटात फोफावलेल्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नागरिकांनी अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना कळवावी, असे आवाहनही राजूर पोलिसांनी केले आहे.