राज्यातील गटसचिवांचे बुधवारपासून असहकार आंदोलन कोपरगाव तालुक्यातील 70 सचिवांचा आंदोलनाला पाठिंबा

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
राज्यातील गटसचिवांचे व सचिवांचे सेवा वेतन विषयक प्रश्न सोडविण्यासाठी शासन उदासीन असल्याने बुधवारपासून (ता.8) राज्यातील 8 हजार गटसचिव, सचिव निवडणूक कामकाज व शासनास जिल्हा सहकारी बँकांना द्यावयाच्या सर्व माहिती यावर बहिष्कार टाकून असहकार आंदोलन व आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन करणार आहेत. राज्य संघटनेचे सचिव संघटनेचे अध्यक्ष गंगाधर आगे, वैभव रंदवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करणार असल्याची माहिती कोपरगाव येथील गटसचिव संघटनेचे अध्यक्ष साहेबराव निकाळे व उपाध्यक्ष संजय गोसावी यांनी दिली.

राज्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून सहकार खाते, लेखापरीक्षण विभाग, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका संस्थांच्या संचालक मंडळ जिल्हा सहकारी संस्था इत्यादी अनेक प्रकारच्या व्यवस्था निर्माण करून संस्थेमधील विविध प्रकारच्या अधिकारी व पदाधिकारी यांचे नियंत्रण व्यवस्थेचा बडगा राज्यातील गटसचिवांच्या, सचिव यांच्या मानगुटीवर बसवत केवळ राज्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या सोयीसाठी गटसचिवांच्या, सचिवांच्या सेवा वेतनाचे सर्व कायदे मोडीत काढून त्यांचे शारीरिक मानसिक व आर्थिक कुचंबना सुरू केली जात आहे.

एकीकडे गटसचिवांच्या सेवा व वेतनाचे सर्व कायदे व नियम मोडीत काढण्यात आले. त्यामुळे संपूर्ण सहकाराचा कणा असणारा गटसचिव, सचिव यांचा बळी जात आहे. यासाठी सचिव यांना न्याय मिळवण्यासाठी गटसचिव व सचिव यंत्रणेकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, प्रधान सचिव, सहकार आयुक्त यांच्यासह शासनाचे अधिकार्यांच्या भेटी घेवून शासन दरबारी पाठपुरावा करुनही न्याय मिळाला नाही. मागण्या पूर्ण होण्यासाठी लोकशाही मार्गाने धरणे, मोर्चे आंदोलने, निवेदन दिले. परंतु राज्यातील शेतकर्यांची अडवणूक होऊ नये यासाठी वेळोवेळी आंदोलन थांबवावे लागले. परंतु शासनाकडून सतत अवहेलना झालेली आहे. गटसचिव, सचिव यांना प्रचंड कामकाजाचा ताण व महागाईच्या झळा सोसत कित्येक पटीने अधिकचे काम करावे लागत आहे.

अतिशय तुटपुंज्या वेतनावर तेही देण्याची जबाबदारी आमची नाही असे सांगत प्रत्येकाकडून अवaहेलना केली जाते. काम करूनही वेतन वेळेवर मिळत नाही. या आर्थिक कुचंबनेमुळे राज्यातील गटसचिवांनी आत्महत्या केल्या आहेत. गटसचिव, सचिव गाव पातळीवरील ग्रामसेवक, तलाठी आणि शिक्षक यांच्या बरोबरीच्या दर्जाचे काम करतात. म्हणून त्यांना लोकसेवक दर्जा देऊन ग्रामसेवकाप्रमाणे समान काम समान वेतन लागू करावे अशा विविध मागण्यांसाठी बुधवारपासून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था निवडणूक विषयक कामकाजावर बहिष्कार टाकून आणि शासनाच्या व जिल्हा बँकांच्या सर्व माहित्या यांवर बहिष्कार आंदोलन तसेच मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष साहेबराव निकाळे यांनी सांगितले. कोपरगाव येथे झालेल्या बैठकीत विठ्ठल जावळे, शिवाजी दवंगे, अशोक गायकवाड, संदीप चौधरी, रवी दातीर, ज्ञानदेव मंचरे, अशोक घेर, बाळासाहेब शिंदे, रामभाऊ वाकचौरे आदी उपस्थित होते.
